भाईंंदर : भाईंदर पश्चिम परिसरातील शेअर रिक्षाचालकांनी कोणतीही अधिकृत मंजुरी नसताना शेअर रिक्षाचे किमान भाडे १२ रुपयांवरून थेट १५ रुपये केले आहे. सुमारे २५ टक्के झालेल्या या भाडेवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी आहे. यापूर्वी भाईंदर पूर्व परिसरातही १० रुपयांवरून १५ रुपये अशी भाडेवाढ करण्यात आली होती. विशेष म्हणजे, मीटरप्रमाणे भाडे आकारण्यास नकार देणे, मनमानी भाडेवसुली आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविण्याचे प्रकार सुरू असतानाही प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), वाहतूक पोलीस आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
मीरा-भाईंदर शहरात विविध परिसरांनुसार रिक्षा संघटना कार्यरत आहेत. भाईंदर पूर्व आणि पश्चिम भागात अनेक शेअर रिक्षा मार्ग सुरू असून, त्यांचे भाडे रिक्षाचालक स्वतःच ठरवत असल्याचे चित्र आहे. डिसेंबर २०२२ मध्ये भाईंदर पश्चिममधील शेअर रिक्षांचे किमान भाडे १० रुपयांवरून १२ रुपये करण्यात आले होते. आता ते थेट १५ रुपये करण्यात आले आहे. भाईंदर रेल्वे स्थानकाबाहेर याबाबतचे फलकही लावण्यात आले आहेत. मात्र, आरटीओच्या अधिकृत मान्यतेचे फलक दिसत नसल्याने या भाडेवाढीच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
भाईंदरमध्ये मीटरप्रमाणे भाडे न आकारणे, स्पेशल भाड्याच्या नावाखाली मनमानी वसुली करणे आणि शेअर रिक्षांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसविण्याचे प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. या मनमानीला आळा घालण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी नियमित तपासणी करून कारवाई करावी, तसेच लोकप्रतिनिधींनीही प्रवाशांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
मीटरपेक्षा शेअर भाडे अधिक
मीटरनुसार पहिल्या दीड किलोमीटरसाठी रिक्षाचे किमान भाडे २७ रुपये आहे. मात्र, शेअर रिक्षामध्ये प्रत्येकी १५ रुपये याप्रमाणे तीन प्रवाशांकडून ४५ रुपये वसूल केले जातात. काही रिक्षाचालक चार प्रवासी बसवून तब्बल ६० रुपये आकारत असल्याचा आरोप आहे. त्यामुळे मीटरच्या तुलनेत प्रवाशांकडून अधिक पैसे वसूल केले जात आहेत.