प्राजक्ता पोळ/मुंबई
मुंबईतील प्रवास आता झपाट्याने आणि परवडणाऱ्या दरात होणार आहे, कारण राज्य परिवहन विभागाने बाइक टॅक्सी सेवा सुरू करण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. या संदर्भात धोरण तयार करण्यात आले असून, त्यासंबंधीचा अहवाल लवकरच विधीमंडळात सादर केला जाणार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, मंजुरी मिळाल्यानंतर ही सेवा या महिन्याच्या अखेरीस किंवा एप्रिलच्या सुरुवातीस सुरू होण्याची शक्यता आहे.
काही महिन्यांपूर्वी 'रॅपिडो'ने मुंबईत बाइक टॅक्सी सेवा सुरू केली होती. मात्र, टॅक्सी आणि रिक्षा संघटनांच्या आक्षेपांमुळे ती बंद करण्यात आली होती. पण २९ जानेवारी २०२५ रोजी झालेल्या बैठकीत सरकारने पुन्हा एकदा बाईक टॅक्सी सेवेच्या मंजुरीला हिरवा कंदील दाखवला.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, सेवेच्या मंजुरीसोबतच परिवहन विभागाने काही नियम आणि अटी निश्चित केल्या आहेत, विशेषतः महिलांच्या सुरक्षेवर भर देण्यात आला आहे. यासंबंधी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वांचा अहवाल तयार केला असून, तो लवकरच विधीमंडळात मांडला जाणार आहे. एकदा मंजुरी मिळाल्यानंतर बाइक टॅक्सी सेवा अधिकृतपणे मुंबईत सुरू केली जाईल.
परिवहनमंत्र्यांच्या माहितीनुसार, देशभरातील २२ राज्यांमध्ये बाइक टॅक्सी सेवा कार्यरत आहे. त्यांनी स्पष्ट केले की, बाइक टॅक्सीचे भाडे ओला, उबर कार टॅक्सी, काळी-पिवळी टॅक्सी आणि ऑटो-रिक्षाच्या भाड्याच्या निम्म्याहूनही कमी असेल.
या योजनेमुळे महाराष्ट्रातील १०,००० ते २०,००० तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील, तसेच प्रवास खर्चात मोठी कपात होईल. बाइक टॅक्सी सेवा ही मुख्यमंत्र्यांच्या १०० दिवसांच्या कृती योजनेत समाविष्ट करण्यात आली आहे. ही सेवा सुरू झाल्यास मुंबईतील दैनंदिन प्रवास स्वस्त, जलद आणि सोयीस्कर होईल.
महिलांच्या सुरक्षेवर विशेष भर
महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुस्पष्ट धोरण तयार करण्यात आले असून, त्यासंबंधी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यात आली आहेत. याचा अहवाल लवकरच विधीमंडळात मांडला जाणार असून, मंजुरी मिळाल्यानंतर सेवा अधिकृतपणे सुरू केली जाईल.
नियम आणि अटी:
भाडे दर ३ रु. प्रति किलोमीटर निश्चित करण्यात आला आहे.
बाइकमध्ये जीपीएस प्रणाली असणे अनिवार्य आहे.
पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशाने हेल्मेट घालणे बंधनकारक आहे.
सर्व बाइक टॅक्सी पिवळ्या रंगात रंगवल्या जातील.