एस. बालकृष्णन/मुंबई
दिल्ली विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर मुंबई मनपावर भाजपने डोळा ठेवला आहे. भाजपच्या मुंबई प्रदेशाने मनपाच्या निवडणुका तातडीने घेण्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली आहे.
भाजपचे उपाध्यक्ष व ज्येष्ठ माजी नगरसेवक रवी राजा म्हणाले की, मुंबई मनपावर गेली तीन वर्षे लोकप्रतिनिधी नाहीत. फेब्रुवारी २०१७ मध्ये मुंबई मनपाची निवडणूक झाली होती. त्या नगरसेवकांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली. नगरसेवकांशिवाय शहराचा कारभार कसा चालू शकतो, असा प्रश्न त्यांनी केला.
मुंबई मनपाचा अर्थसंकल्प ७५ हजार कोटींचा आहे. हे शहर नोकरशहांच्या जीवावर कसे चालवले जाऊ शकते, असे माजी नगरसेवकांचे म्हणणे आहे. अनेक महत्वाच्या समस्या सोडवण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. मुंबई मनपाच्या २४ प्रभागातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न गंभीर बनला आहे. फुटपाथ, रस्त्यांवर अवैध फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून वायू प्रदूषण, अवैध खाद्य पदार्थांचे स्टॉल आदी समस्या आहेत.
‘एम’ (पश्चिम) प्रभागात व अन्य प्रभागांमध्ये अनेक अवैध बांधकामांच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. तरीही पालिका अधिकारी त्याच्यावर कारवाई करत नाहीत. अवैध बांधकामाची तक्रार झाल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मात्र, प्रभागातील अधिकारी अवैध बांधकामावर कारवाई करत नाहीत.
विलेपार्ले येथील भाजपचे आमदार पराग अळवणी म्हणाले की, येत्या मेमध्ये महापालिकेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेल्या खटल्याला गती मिळण्याची कायदेशीर शक्यता तपासली पाहिजे आणि लवकरात लवकर निवडणुका घेण्यात याव्यात.
भाजपचे दुसरे आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, आम्हाला लवकर निवडणुका हव्या असून आम्ही त्यात विजय होऊ. सुप्रीम कोर्टात मुंबई मनपाच्या प्रभाग रचनेबाबतची याचिका प्रलंबित आहे, त्यावर ते म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे हे सुप्रीम कोर्टात गेले आहेत. आमचा पक्ष म्हणून आम्ही निवडणुकीसाठी कधीही तयार आहोत.
भाजपचे माजी आमदार म्हणाले की, राज्य सरकारने कायदेशीर टीम तयार करावी. तसेच सुप्रीम कोर्टात याबाबत लवकर सुनावणी व्हावी. आता यासाठी इतका विलंब का होत आहे, हे कळत नाही.
महाराष्ट्र, हरयाणा व आता दिल्ली निवडणुकीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. भाजप स्बळावर बहुमत मिळवू शकते, असे पक्ष कार्यकर्त्यांना वाटते. पण, पक्षाला महायुतीच्या नावाखाली निवडणूक लढवावी लागणार आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला शहरात काही जागा मिळू शकतील. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची मुंबईत संघटनात्मक ताकद नाही.
महाविकास आघाडी या मनपा निवडणुका एकत्रित लढणार की वैयक्तिक हे अजूनही ठरलेले नाही. शिवसेना (उबाठा) ही निवडणूक एकट्याने लढवायची आहे. तर काँग्रेसमध्येही शिवसेनेसोबत ही निवडणूक लढवू नये, असा मतप्रवाह आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचेही (शरद पवार गट) यांचेही मुंबईत फार स्थान नाही. एकूणच, मविआतील घटक पक्ष त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार त्यांची ताकद तपासू इच्छितात. मविआतील वादामुळे भाजपचे काम सोपे होईल.