मुंबई : मुंबई महानगरपालिकेने बांधलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प अंतर्गत हाजी अली येथील पुलावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण केल्याची दृश्ये तसेच छायाचित्रे प्रसारमाध्यमातून प्रसारित होत आहेत. त्यावरून प्रकल्पाच्या बांधकामात दोष असल्याचे आरोप प्रसारमाध्यमातून केले जात आहेत. या आरोपांचे पालिका प्रशासनाने खंडन केले आहे.
सदर आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. आणि हा प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाने दिले आहे. तसेच या रस्त्यावर कोणतेही तडे अथवा खड्डे नाही. आणि प्रसारमाध्यम व समाजमाध्यमांतून प्रसारित होत असलेल्या चित्रफितींमध्ये किनारी रस्त्यावर दिसणारे पट्टे (पॅचेस) हे मुळात खड्डे प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाकलेल्या मास्टिकच्या आवरणाचे आहेत. येत्या १५ ते २० दिवसांत या मार्गांचे स्वरुप पूर्ववत करण्यात येईल, असेही पालिकेने स्पष्टीकरणात म्हटले आहे.
डांबरीकरणाच्या काही भागांमध्ये सांधे रुंद झाले होते. हे सांधे आणखी रुंद होवू नये आणि डांबरीकरण पूर्णपणे मजबूत रहावे, टिकावे यासाठी त्यावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण ठिकठिकाणी टाकण्यात आले आहे. कारण पावसाळा सुरू झाल्यानंतर, सततच्या व जोरदार पावसामुळे डांबरीकरणाचे नुकसान होऊ नये, रस्त्यांवर खड्डे होऊ नयेत, हा त्यामागचा हेतू आहे. या ठिकाणी आता अस्फाल्टचा नवीन थर निकषानुसार देण्यात येणार आहे. येत्या १५ ते २० दिवसांत या मार्गांचे स्वरुप पूर्ववत करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.