मुंबई

जगज्जेत्यांच्या सेलिब्रेशननंतर ५ जीप भरून बूट, चपला एका रात्रीत जमा; २ डंपर भरून कचरा गोळा

‘टी-२० वर्ल्ड कप’ विजेत्या भारतीय टीमचे गुरुवारी मरिन ड्राइव्ह परिसरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी लाखोंचा जनसागर उसळला होता. जेतेपदाचे सेलिब्रेशन रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Swapnil S

मुंबई : ‘टी-२० वर्ल्ड कप’ विजेत्या भारतीय टीमचे गुरुवारी मरिन ड्राइव्ह परिसरात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी लाखोंचा जनसागर उसळला होता. जेतेपदाचे सेलिब्रेशन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे यांची एक झलक मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी लाखो क्रिकेटप्रेमी दक्षिण मुंबईत जमले होते. रात्री उशिरा स्वागत सोहळा संपल्यानंतर मरिन ड्राईव्ह परिसरात चपला, बूट व कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. मात्र, मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांनी एका रात्रीत मरिन ड्राइव्ह परिसराची स्वच्छता केली व हा परिसर चकाचक केला.

या सफाई मोहिमेत पाच जीप भरून बूट, चपला जमा झाल्या, तसेच दोन डंपर भरून कचरा गोळा करण्यात आला. मरिन ड्राईव्ह परिसरात दररोज सकाळी चालण्यासाठी येणाऱ्या (मॉर्निंग वॉक) मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मरिन ड्राइव्ह परिसरात ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार संपूर्ण रात्रभर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अथकपणे स्वच्छता मोहीम राबवली. रात्री उशिरा भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी थांबलेली गर्दी ओसरू लागताच तातडीने स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. ‘ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांच्या देखरेखीखाली या संपूर्ण परिसराची सफाई करण्यात आली.

‘ए’ विभागाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सुमारे १०० कामगार, तसेच स्वयंसेवी संस्थांच्या कामगारांच्या मदतीने केलेल्या या कार्यवाहीत एक कॉम्पॅक्टर आणि एक डंपर कचरा संकलित झाला. त्यासोबतच छोट्या पाच जीप भरून बूट व चपला संकलित करण्यात आल्या. रात्री सुमारे ११.३० पासून सुरू झालेली ही कार्यवाही सकाळी ८ वाजेपर्यंत सुरू होती. त्यामुळे मॉर्निंक वॉकसाठी येणाऱ्या मुंबईकरांना पुन्हा स्वच्छ मरिन ड्राइव्ह उपलब्ध झाला, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सापडलेल्या वस्तूंवर पुनर्प्रक्रिया

स्वच्छता मोहिमेतून खाद्यपदार्थांचे वेष्टन (रॅपर्स), पाण्याच्या बाटल्या, पिशव्या, यासह बूट, चप्पल आणि इतर वस्तूदेखील मोठ्या प्रमाणात संकलित करण्यात आल्या. या संकलित कचऱ्यापैकी सुमारे ५ जीप भरून जमा झालेले बूट, चप्पल व इतर पुनर्प्रक्रिया योग्य वस्तू क्षेपणभूमीवर न पाठवता त्या पुनर्प्रक्रियेसाठी देण्यात येणार आहेत.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video