मुंबई : मुंबईत १ कोटी ३ लाख ४४ हजार ३१५ मतदार आहेत. त्यापैकी पुरुष मतदार ५५ लाख १६ हजार ७०७ तर ४८ लाख २६ हजार ५०९ महिला मतदार आहेत. त्यामुळे यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महिला मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हाती याव्यात यासाठी सर्वंच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
लोकसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला नाकारल्याने विधानसभा निवडणुकीत मतदारराजाचा कौल आपल्याला मिळावा यासाठी महायुती सरकारने विविध योजनांचा पाऊस पडला. यात महिलांसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि महिलांच्या बँक खात्यात पैसेही जमा झाले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी होत असल्याने विधानसभा निवडणुकीत राज्यातील नोकरदार महिलांसह लाडक्या बहिणींनी महायुतीला पसंती दिली. आता मुंबई महानगरपालिकेची सूत्री हाती घेण्यासाठी राजकीय पक्षांनी रणनीती आखली आहे.
लोकसभा, विधानसभा, नगरसेवक पदाची निवडणूक असो मतदारांचा कौल त्या त्या पक्षाचे भवितव्य ठरवतो. विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने कौल दिला आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेचा कौल मिळावा यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र मतदारांचा कौल हा राजकीय पक्षाचे भवितव्य ठरवतो. त्यात मुंबईत १ कोटी ३ लाख ४४ हजार मतदार असून ४८ लाख महिला मतदार आहेत. ४८ टक्के महिला मतदार असल्याने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महिलांचे मतदान मुंबई महानगरपालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
असे आहेत मतदार
पुरुष - ५५,१६,७०७
महिला - ४८,२६,५०९
अन्य - १,०९९
एकूण - १, ०३, ४४, ३१५