मुंबई : मरणानंतर अंत्यसंस्कारावेळी मृताच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कारासाठी वाट पाहावी लागू नये, यासाठी मुंबई महापालिकेने भौगोलिक माहिती यंत्रणेवर आधारित ‘स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली (ॲप)’ सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सेवेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका संचालित स्मशानभूमी/दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची सेवा उपलब्ध होणार आहे. तर या व्यवस्थापन प्रणालीचा वापर १९ जुलै पासून करता येणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
मुंबई पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या निर्देशानुसार मुंबई पालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते आणि माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत भौगोलिक माहिती प्रणालीवर आधारित ‘स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली (ॲप)’ सेवा सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान व्यवस्थापन प्रणालीवर अंत्यसंस्काराची नोंदणी केल्यानंतर, तयार होणाऱ्या नोंदणी क्रमांकामुळे, नोंदणीची खात्रीलायक माहिती नागरिकांना प्राप्त होणार आहे. नोंदणी केलेल्या वेळेमध्ये अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी / दफनभूमीवर पोहोचणे शक्य न झाल्यास नोंदणी केलेला कालावधी हा व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून इतरांकरिता प्रणालीमध्ये उपलब्ध केला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
दरम्यान मुंबई महानगरपालिकेने सुरू केलेल्या नव्या स्मशानभूमी व्यवस्थापन प्रणाली ॲॅपमुळे आता अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या लोकांच्या वेळेत बचत होणार आहे.
ऑनलाईन पद्धतीने या सुविधा उपलब्ध
मृत व्यक्तीच्या स्थानापासून ५ किलोमीटर परिसरांतील अथवा निवडीद्वारे संपूर्ण मुंबई महानगरांतील स्मशानभूमी / दफनभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी वेळ नोंदणी (स्लॉट बुक) करणे.
स्मशानभूमी / दफनभूमी मधील उपलब्धता पाहणे.
नागरिकांच्या प्रथेनुसार स्मशानभूमी / दफनभूमी निवडीचा पर्याय.
अंत्यसंस्काराच्या नोंदणीची माहिती, त्यात बदल करणे किंवा रद्द झाल्यास माहिती लघुसंदेश अर्थात ‘एसएमएस’द्वारे प्राप्त होणे.