मुंबई : प्रदूषणमुक्त दिवाळी अभियानातून बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाचा व्हिडीओ हटवण्याच्या महापालिकेच्या कृतीची उच्च न्यायालयाने मंगळवारी गंभीर दखल घेत चिंता व्यक्त केली. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, याचे भान ठेवा अशा शब्दांत न्यायालयाने भाजपच्या नेत्यांची नामोल्लेख टाळून कानउघाडणी केली. तसेच हटवलेला व्हिडीओ पुन्हा प्रसारित करण्याचे निर्देश महापालिकेला दिले.
भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात सार्वजनिक हितासाठी पुढे येणाऱ्या सेलिब्रिटींच्या निवडीला राजकीय नेत्यांनी जातीय रंग देणे. त्यावरून राजकारण करणे दुर्दैवी आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाविरुद्ध आहे, अशी खंत न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने व्यक्त केली.
न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी अभिनेत्री आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्या दिया मिर्झा यांची ध्वनिचित्रफित प्रसिद्ध केली होती. त्याला भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आक्षेप घेतला होता. राजकीय दबावापोटी पालिकेने ही ध्वनिचित्रफीत हटवली. या प्रकाराची न्यायालयाने सू-मोटो याचिकेद्वारे दखल घेतली.
न्यायालयाच्या आदेशानंतर पालिका आयुक्तांनी दिया मिर्झा यांच्याबाबत घेतलेला निर्णय योग्य होता. त्यांनी तो कायद्याच्या चौकटीत घेतला होता. त्यामुळे आयुक्तांच्या या आदेशाला कोणीही आव्हान देऊ शकत नाही अथवा त्याला जातीय रंग देऊन राजकारण करू शकत नाही. मिर्झा यांच्या नावावरून जे राजकारण झाले ते दुर्दैवी आहे, अशी खंत न्या. गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
न्यायालय काय म्हणाले...
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे याचे भान प्रत्येकाने ठेवणे आवश्यक.
दिवाळी हा सण जात-पात अथवा धर्म याचा विचार न करता सर्वजण एकत्र येऊन साजरा करतात. केवळ एखादी व्यक्ती दुसरा धर्माची आहे म्हणून तिच्या सहभागाला आक्षेप घेणे अत्यंत दुर्देवी.
आरोग्य, प्रदूषण आणि पर्यावरणाचा विचार करताना गटबाजी अथवा बेताल टिप्पणीमुळे समाजातील संतुलन बिघडू नये.
फटाक्यांवर बंदी घालणे म्हणजे सण साजरा करण्याचा हक्क काढून घेणे नाही, वायू प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने अत्यंत योग्य संदेश व्हिडिओमध्ये होता.
विरोध म्हणजे काही मोजक्या लोकांचे भरकटलेले विचार आहेत. म्हणून महापालिकेने हा व्हिडिओ पुन्हा अपलोड करून नागरिकांचा विश्वास संपादन करावा.
राजकारण्यांच्या वक्तव्याने आम्ही व्यथित झालो - न्यायालय
न्यायालयाने सर्वांना जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याची परवानगी दिली होती. हा पूर्णपणे पर्यावरणाशी संबंधित मुद्दा होता. मात्र काही राजकारण्यांनी त्याचे केलेले राजकीय भांडवल आणि त्यांच्या असंबंध वक्तव्यामुळे आम्ही व्यथित झालो आहोत. भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे, याचे प्रत्येकाने भान ठेवले पाहिजे, असे न्यायालयाने सुनावले.
भाजप नेत्यांनी देशाची माफी मागावी - काँग्रेस
दिया मिर्झा व्हिडीओ प्रकरणात उच्च न्यायालयाने भाजप नेत्यांना चपराक लगावली आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाने माफी मागावी. तसेच प्रदूषणमुक्त दिवाळी मोहिमेची ध्वनिचित्रफीत हटविण्यास जबाबदार असलेल्या महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, ‘द्वेषाचे राजकारण करणाऱ्या अमित साटम यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांना थोडी जरी लाज वाटत असेल, तर त्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी’.
हा तर छोटा मुद्दा - मुख्यमंत्री
पुणे : दिया मिर्झा हिच्या व्हिडीओवरून उद्भवलेल्या वादाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘छोटा मुद्दा’ संबोधत त्याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न मंगळवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. तसेच, उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारलेले नाही, असा दावाही त्यांनी केला.
‘उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले आहे, असे मला वाटत नाही. न्यायालयाने कदाचित काही मत व्यक्त केले असेल. कारण हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलेच नव्हते. मग महापालिकेला फटकारण्याचा प्रश्नच कुठे येतो?’, असे फडणवीस म्हणाले. संबंधित ध्वनिचित्रफीत हटविण्याबाबत फडणवीस म्हणाले, ‘होय, ती क्लिप हटविण्यात आली असून हा मुंबई महापालिकेचा निर्णय आहे. कोणता आशय ठेवायचा आणि कोणता हटवायचा, हे समाज माध्यम खातेधारक ठरवत असतो. महापालिकेनेही तेच केले आहे.’
दिया मिर्झा चांगल्या अभिनेत्री असतील; मात्र त्या देशातील फार मोठ्या नेत्या नव्हेत. त्यामुळे हा माझ्या स्तरावरील मुद्दा आहे, असे मला वाटत नाही. माझ्या स्तरावरील प्रश्न मला विचारा.देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
महापालिकेत विदुषकी चाळे - आदित्य ठाकरे
भाजप सत्ता आल्यानंतर प्रशासनाचे रूपांतर एखाद्या सर्कसमध्येच करतो! महापालिकेत सध्या सुरू असलेला प्रकार म्हणजे निव्वळ विदुषकी चाळे आहेत. जगभरातील महापौरांचे लक्ष प्रामुख्याने नागरी समस्यांवर केंद्रित असते. मात्र, आमच्या महापौरांचे लक्ष पालिकेनेच तयार करून घेतलेल्या व्हिडीओतील अभिनेत्रीच्या धर्मावरच केंद्रित झाले आहे!