भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या सत्रातही तेजीचे फटाके गुंतवणूकदारांनी फोडले. विदेशात नकारात्मक वातावरण असतानाही माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाल्याने आणि रुपया सावरल्याने गुंतवणूकदारांना विश्र्वास परत येण्यास मदत झाली.
गुरुवारी दिवसभरात दोलायमान स्थितीनंतर दि ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स ९५.७१ अंक किंवा ०.१६ टक्का वाढून ५९,२०२.९०वर बंद झाला. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ५१.७० अंकांनी वाढून १७,५६३.९५वर बंद झाला.
सेन्सेक्सवर्गवारीत एचसीएल टेक्नॉलॉजीजचा समभाग सर्वाधिक २.२२ टक्के वधारला. तर त्यानंतर टेक महिंद्रा, एनटीपीसी, पॉवरग्रीड, बजाज फिनसर्व, नेस्ले इंडिया, भारती एअरटेल, टीसीएस आणि इन्फोसिस यांच्या समभागात वाढ झाली. तर इंडस्इंड बँक, एशियन पेंटस्, अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, टायटन आणि ॲक्सिस बँक यांच्या समभागात घसरण झाली. सेन्सेक्समधील ३० पैकी १८ कंपन्यांच्या समभागात वाढ झाली.
आशियाई बाजारात सेऊल, टोकियो, शांघायमध्ये घसरण तर युरोपमध्ये दुपारपर्यंत संमिश्र व्यवहार सुरु होते. दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.१६ टक्के वधारुन ९३.४८ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल झाले. तसेच विदेशी संस्थांनी बुधवारी ४५३.९१ कोटींच्या समभागांची विक्री केली.