मुंबई

बोरिवलीत कार पार्किंग लिफ्ट कोसळली; एकाचा मृत्यू, एक जखमी

बोरिवली पश्चिम येथील लिंक रोड परिसरात शुक्रवारी सकाळी भीषण दुर्घटना घडली. एका २१ मजली निवासी टॉवरमध्ये कार पार्किंगसाठी वापरली जाणारी लिफ्ट अचानक कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला असून, दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे.

नेहा जाधव - तांबे

बोरिवली पश्चिम येथील लिंक रोड परिसरात आज सकाळी भीषण दुर्घटना घडली. एका २१ मजली निवासी टॉवरमध्ये कार पार्किंगसाठी वापरली जाणारी लिफ्ट अचानक कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला असून, दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना ‘ ओम प्रथमेश बिल्डिंग’मध्ये सकाळी अंदाजे ११ वाजता घडली.

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर कार लिफ्ट सुमारे ७ मीटर खोल खड्ड्यात कोसळली. त्यामध्ये दोन व्यक्ती अडकले होते.

या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बचाव कार्य सुरू करत शुभम मदनलाल धुरी (३०) आणि सुनजीत यादव (४५) या दोघांना लिफ्टमधून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना जवळच्या बीएमसी संचालित शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शुभम धुरी यांना मृत घोषित केले. सुनजीत यादव यांच्या डोक्याला दुखापत झाली असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. लिफ्ट कोसळण्यामागचे नेमके कारण काय, याचा तपास सुरू असून, लिफ्टच्या देखभाल व्यवस्थेत हलगर्जीपणा तर झाला नाही ना, याचाही शोध घेतला जात आहे.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. लिफ्टच्या देखभालीबाबत संबंधित व्यवस्थापनाची निष्काळजी भूमिका असल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, जबाबदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

ही घटना महानगरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या उंच इमारतींमध्ये वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक सुविधा आणि त्याच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video