मुंबई

Mumbai : दिवाळीच्या रॉकेटमुळे ३ दुकाने जळून खाक; बोरिवलीमधील घटना

दिवाळीमध्ये फटाके जपून वापरण्याचा वारंवार सल्ला दिला जातो. रॉकेटसारखे फटाके उघड्या मैदानावर लोकवस्तीहून दूर वाजवण्याबद्दल अनेकदा सूचना दिल्या जातात. अशाच निष्काळजीपणातून बोरिवली येथे दुर्घटना घडली.

नेहा जाधव - तांबे

दिवाळीमध्ये फटाके जपून वापरण्याचा वारंवार सल्ला दिला जातो. रॉकेटसारखे फटाके उघड्या मैदानावर लोकवस्तीहून दूर वाजवण्याबद्दल अनेकदा सूचना दिल्या जातात. अशाच निष्काळजीपणातून बोरिवली येथे दुर्घटना घडली. बोरिवली पश्चिम येथील शिंपोली रोड परिसरात एक रॉकेट आरशांच्या दुकानावर पडले आणि मोठी आग लागली. या आगीत ३ शेजारील दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली, तर एका दुचाकीचेही नुकसान झाले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या आणि काही तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. तथापि, दुकानदारांना मोठ्या आर्थिक फटक्याचा सामना करावा लागला आहे.

संपूर्ण स्टॉक जळाला

आरशांच्या दुकानाचे मालक सुलतान खान यांनी सांगितले, “आग लागल्यानंतर आमचा संपूर्ण स्टॉक जळून गेला. सुमारे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. डिझायनर आरसे, साउंडप्रूफ पॅनेल्स आणि रंगीत काचेसह सर्व साहित्य जळाले.”

त्यांनी पुढे सांगितले, “स्थानिकांनी सांगितले की, एक रॉकेट आमच्या दुकानाच्या छतावर पडले होते. छत ताडपत्रीने झाकलेले होते, त्यामुळे ठिणगी लागून आग पसरली असावी. एका छोट्या रॉकेटमुळे इतकी मोठी हानी होईल, याची कल्पनाच नव्हती.”

दिवाळी सणात निष्काळजीपणामुळे मोठा धोका

सणासुदीच्या काळात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून, प्रशासनाने नागरिकांना फटाके वापरताना काळजी घेण्याचे आणि सार्वजनिक ठिकाणी फटाके न फोडण्याचे आवाहन केले आहे.

विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेपद रिक्त

हाऊसिंग सोसायटी समितीची सदस्यसंख्या दोन-तृतीयांशपेक्षा कमी होते, तेव्हा समिती आपोआप कायदेशीर स्थान गमावते : HC

मुंबई विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेत मराठीत विचारण्यात येणार प्रश्न; विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

जपान-चीनमध्ये तणाव! चीनने जपानी लढाऊ विमानाचे रडार केले ‘लॉक’

दुचाकी वाहनांनाही पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळणार; RTO कडून प्रक्रिया सुरू, एकाच क्रमांकासाठी जास्त अर्ज आल्यास लिलाव