मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत गाऊन वादात सापडलेल्या स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराने सोमवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यात यावेत, अशी विनंती करतानाच कुणाल कामराच्या वकिलांनी शिवसेना शिंदे गटाकडून धमक्या येत असल्याचे न्यायालयाला सांगितले. धमक्यांच्या पार्श्वभूमीवर कारवाईपासून तातडीने दिलासा देण्याची विनंती ज्येष्ठ वकील नवरोज सिरवाई यांनी केली. याची गंभीर दखल न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने घेत याचिकेची तातडीने मंगळवार दि 8 एप्रिलला सुनावणी घेण्याचे निश्चित केली.मात्र तातडीने अंतरिम संरक्षण देण्यास नकार देत कामरा याने संबंधित एकलपीठाकडे दाद मागावी, असेही स्पष्ट केले.
कुणाल कामराने गद्दार गीत गायल्यामुळे वादाला तोंड फुटले. त्या गीतानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आक्रमक झाले.आमदार मुरजी पटेल यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्याआधारे कुणालविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे अटकेच्या भीतीने कुणालने मद्रास उच्च न्यायालयाकडून ७ एप्रिल पर्यंत अंतरीम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करून घेतला होता. त्या जामिनाची मुदत सोमवारी संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर कामरा याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत गुन्हा रद्द कारण्यात यावा अशी विनंती करणारी याचिका दाखल केली.
कुणालच्या वतीने ज्येष्ठ वकील ऍड. सिरवाई यांनी न्या.सारंग कोतवाल आणि न्या.श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर याचिका सादर केली. कुणालला सध्या शिवसेना शिंदे गटाकडून धमक्या येत असून त्याच्या जीवाला धोका आहे. त्या पार्श्वभूमीवर याचिकेवर तातडीने सुनावणी घेऊन अटकेपासून संरक्षण द्या, अशी विनंती ऍड. सिरवाई यांनी केली.
त्यावर खंडपीठाने याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतली. मात्र अटकेच्या कारवाईपासून संरक्षण देण्यास नकार दिला. याचवेळी याचिकेवर मंगळवारी सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली. पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे संविधानाच्या अनुच्छेद १९ अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचे आणि अनुच्छेद २१ अंतर्गत जगण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करतात, असा दावा याचिकेतून केला आहे. न्यायालयाने तातडीचा दिलासा देण्यास नकार दिल्याने मंगळवारी होणाऱ्या सुनावणीवेळी न्यायालय कोणती भूमिका घेतेय, याकडे कुणालसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
कामराला अटकेपासून संरक्षणाला मुदतवाढ
स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या अटकपूर्व जामीनाची मुदत १७ एप्रिलपर्यत वाढवत सोमवारी त्याला आणखी दिलासा दिला. या संदर्भातील वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.