नवी दिल्ली : सुमारे ९०४.३२ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) फ्युचर रिटेल आणि प्रसिद्ध उद्योगपती किशोर बियाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच शुक्रवारी मुंबईतील बियाणी यांच्याशी संबंधित विविध ठिकाणांवर छापे टाकले. या प्रकरणात किशोर बियाणी यांचे बंधू राकेश बियाणी यांनाही आरोपी करण्यात आले आहे.
सीबीआयने ४ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शुक्रवारी मुंबईतील अनेक ठिकाणी झडती घेण्यात आली. या कारवाईदरम्यान तपासाशी संबंधित आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आल्याचे सीबीआयच्या प्रवक्त्यांनी सांगितले. बँकेची फसवणूक करण्यासाठी गुन्हेगारी कट रचणे आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) स्ट्रेस्ड ॲसेट्स मॅनेजमेंट ब्रँच-३, मुंबई यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
सीबीआयच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, फ्युचर रिटेल लिमिटेड, कंपनीचे प्रवर्तक, व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक आणि हमीदार किशोर बियाणी, राकेश बियाणी, तसेच अनोळखी सरकारी अधिकारी आणि अन्य व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कथित गैरव्यवहारामुळे तक्रारदार बँकेचे ९०४.३२ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.
कर्ज मिळवण्यासाठी गुन्हेगारी कटाचा आरोप
आरोपींनी स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच नऊ बँकांच्या समूहाकडून कर्ज मिळविण्यासाठी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. फ्युचर रिटेल कंपनी बिग बाजार, फॅशन अॅट बिग बाजार आणि फूड हॉल यांसारख्या हायपरमार्केट आणि सुपरमार्केटच्या माध्यमातून किरकोळ व्यापारात होती. तसेच कंपनीच्या स्टोअर्समधून एफएमसीजी आणि फॅशन उत्पादनांचा सर्वसाधारण व्यापारही केला जात होता.