मुंबईत कुठलीही दुर्घटना घडल्यानंतर जलदगतीने बचावकार्य सुरू करत अडकलेल्यांचा जीव वाचवणे हे मुंबई अग्निशमन दलाचे कर्तव्यच. आता अग्निशमन दलातील जवानांच्या मदतीला ‘सिटी डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स’चे (सीडीआरएफ) जवान सज्ज झाले आहेत.
सीडीआरएफमध्ये सध्या १५० जवान कार्यरत असून या जवानांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच शहर व दोन्ही उपनगरात किती जवान स्टँडबाय ठेवायचे, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाचे तांत्रिक सल्लागार राजेंद्र चौधरी यांनी दिली.
नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्सच्या (एनडीआरएफ) धर्तीवर मुंबई महापालिकेने २०१८मध्ये सीडीआरएफची स्थापना केली. मुंबईत रोजच आग लागणे, इमारत दुर्घटना घडतात, असे नाही. त्यामुळे १५० जवान सध्या विविध रुग्णालयात आपली सेवा बजावत आहेत. या सगळ्या जवानांना प्राथमिक प्रशिक्षण दिले असून आता आगीच्या घटनेत रेस्क्यू ऑपरेशन, बचावकार्य कशा प्रकारे करायचे हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाले की, या १५० जवानांना शहर व दोन्ही उपनगरात कुठल्या ठिकाणी नियुक्ती करायची, याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे चौधरी यांनी सांगितले.