मुंबईची जीवनवाहिनी म्हणजे लोकल सेवा. दररोज लाखो प्रवासी कामानिमित्त याच लाइफलाइनमधून प्रवास करत असतात. प्रवाशांपाठोपाठ जाहिरातदारांचीही याच लाइफलाइनला पसंती मिळत असते. त्यामुळेच रेल्वेच्या माध्यमातून आपल्या उत्पादनाचा पोहोच प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक कंपन्या प्रयत्नशील असतात. त्याचाच एक भाग म्हणून नुकत्याच बिगरडिजिटल मीडिया जाहिरातींच्या हक्कांसाठी झालेल्या ई-लिलावात परळचा बोलबाला पाहायला मिळाला. जाहिरातदारांनी सर्वाधिक पसंती परळ स्थानकाला दिली.
परळ स्थानकाला सर्वाधिक बोली मिळाली असून आता याच स्थानकातून रेल्वेला वर्षाकाठी ३२ लाख ४ हजार रुपयांचा महसूल मिळणार आहे. जाहिरातदारांनी परळ स्थानकाचे महत्त्व ओळखून ब्रँड एक्स्पोजरची अचूक संधी हेरली. ठाकूर्ली स्थानकानेही जाहिरातदारांची पसंती मिळवत दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली प्राप्त केली. या स्थानकावर २६ लाख ७५ हजार ३४० रुपयांची बोली लावण्यात आली. मोक्याच्या ठिकाणामुळे ठाकूर्ली स्थानक जाहिरातदारांच्या पसंतीस उतरले. त्यामुळे प्रभावीपणे आपल्या लक्ष्यित प्रवाशांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल, अशी जाहिरातदारांची अपेक्षा आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील कोपर स्थानकावर तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोली लावण्यात आली. त्यामुळे आता कोपर स्थानकाद्वारे मध्य रेल्वेला वर्षाला १८ लाख १५ हजार ३०० रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. कोपर स्थानकातून प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांमुळे हे स्थानक जाहिरातदारांच्या निशाण्यावर होते.
सर्वाधिक प्रवाशांचा होणारा प्रवास तसेच ब्रँड एक्स्पोजरची सर्वाधिक संधी असल्यामुळे आसनगाव स्थानकावरही ६ लाख ५० हजार रुपयांची बोली लावण्यात आली. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) स्थानकावरही ६ लाख ३३ हजार रुपयांची बोली लावण्यात आली. दरदिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे लक्ष वेधून घेणाऱ्या टिळक नगर स्थानकानेही ४ लाख रुपयांची बोली जिंकली.
गुरु तेगबहादूर नगर (जीटीबीएन) स्थानकावरील ब्रँड दृश्यमानता लक्षात घेऊन जाहिरातदारांनी या स्थानकावर ३ लाख ५० हजार रुपयांची बोली लावली. शिवडी स्थानकावर वर्षाला ३ लाख ४० हजार रुपयांची बोली लावण्यात आली. तर डोलवली स्थानकावर अवघ्या ३० हजार रुपयांची बोली लावण्यात आली.
वर्षाला १ कोटी रुपयांची कमाई
ई-लिलावात अनेक जाहिरातदारांनी रेल्वे स्थानकांना पसंती दर्शवली, त्यामुळे आता मध्य रेल्वेची बिगरडिजिटल जाहिरातींद्वारे वर्षाला तब्बल १ कोटी रुपयांची कमाई होणार आहे. हा करार तीन वर्षांसाठी असल्यामुळे रेल्वेला तीन वर्षांसाठी ३ कोटी २ लाख ९२ हजार ९२० रुपयांचा महसूल मिळणार आहे. जाहिरातदारांनी आपल्या उत्पादनांच्या जाहिरातींसाठी मुंबईतील महत्त्वपूर्ण स्थानकांची निवड निश्चित केली आहे. रेल्वे स्थानकांवरून बिगरडिजिटल जाहिराती प्रदर्शित करणे हे प्रभावी माध्यम म्हणून समोर आल्याने जाहिरातदारांनी त्याची उपयुक्तता ओळखली आहे, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
तीन वर्षांच्या कालावधीसाठी जाहिरातदारांनी एकूण नऊ स्थानकांना पसंती दर्शवत आपली स्थानके निश्चित केली आहेत. या ई-लिलावाला जाहिरातदारांची अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अव्वल जाहिरातदारांनी या लिलावात भाग घेऊन बोली लावल्याने आता रेल्वेची घसघशीत कमाई होणार आहे. परळ, ठाकूर्ली, कोपर या महत्त्वाच्या स्थानकांसह लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी), गुरु तेगबहादूर नगर (जीटीबीएन), शिवडी, टिळक नगर, डोलवली आणि आसनगाव या रेल्वे स्थानकांच्या जाहिरातींचे हक्क विकले गेले आहेत.
-डॉ. शिवराज मानसपुरे, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी