मुंबई : श्रद्धा, पवित्रता आणि सूर्यदेवावरील भक्तीचे प्रतीक असलेल्या चार दिवसांच्या भव्य आणि आध्यात्मिक छठ पूजेमुळे केवळ मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) सुमारे ३ हजार कोटींची, तर देशभरात एकूण ३८ हजार कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल अपेक्षित असल्याचे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांनी म्हटले आहे.
देशभरातील सुमारे १५ कोटी महिला-पुरुष भक्त उपवास, स्नान आणि अस्त व उदय होत असलेल्या सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचे विधी पार पाडत आहेत. छठ पूजेचा वाढता आर्थिक प्रभाव हा या सणाचा एका प्रादेशिक साजऱ्यापासून सर्व भारताला एकत्र आणणाऱ्या राष्ट्रीय उत्सवात झालेला प्रवास अधोरेखित करतो.
संस्थेचे राष्ट्रीय मंत्री आणि ऑल इंडिया एडिबल ऑइल ट्रेडर्स फेडरेशनचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी सांगितले की, 'छठ पूजेची वाढती लोकप्रियता सांस्कृतिक एकात्मतेला बळकटी देते तसेच देशाच्या अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लावते. गेल्या वर्षी या सणादरम्यान सुमारे ३१ हजार कोटी रुपयांचा व्यापार झाला होता. तर २०२३ मध्ये २७ हजार कोटी व्यापार झाला होता. म्हणजे छठसंबंधी व्यापारात सातत्याने वाढ होत आहे,' असे त्यांनी नमूद केले.
'सीएआयटी' चे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, सुप, दोरा, दलिया, मातीचे दिवे, बांबूच्या टोपल्या, ऊस, फळे, लिंबू, गव्हाचे पीठ, ठेकुआ मिठाई, खजूर, साड्या, भांडी, तूप, दूध आणि सजावटीचे साहित्य या वस्तूंची मोठ्या प्रमाणात मागणी असून त्यामुळे लघुउद्योजक, कारागीर आणि स्थानिक उद्योगांना मोठ्या प्रमाणात व्यापाराच्या संधी निर्माण होत आहेत.
बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, दिल्ली, उत्तराखंड, हरयाणा, महाराष्ट्र, विदर्भ आणि मध्य प्रदेशासह देशभरात हा सण अतिशय उत्साहात साजरा होत असून, पूर्वांचलातील लाखो लोक आपल्या मूळ गावी नसतानाही श्रद्धापूर्वक छठ साजरी करत आहेत.
निर्माल्य कलश व स्वच्छतेची व्यवस्था
छठ पूजेच्या काळात पूजास्थळांवर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व धूम्रफवारणी यावर भर दिला जाणार आहे. सर्व पूजास्थळांवर पुरेशा प्रमाणात निर्माल्य कलश आणि तात्पुरत्या प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
उत्सवकाळात ४०३ वस्त्रांतरगृह
या उत्सवासाठी ४०३ वस्त्रांतरगृह उभारण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी वाहतूक पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय राखण्यात आला आहे. वाहनतळासाठी ही पोलिसांशी समन्वय साधण्यात येत आहे.
प्राथमिक वैद्यकीय सुविधांची व्यवस्था
उत्सवस्थळी प्राथमिक वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. छठ पूजेच्या काळात सर्व -उपाययोजना योग्यरीतीने राबवल्या -जात आहेत की नाही, हे पाहण्यासाठी - संबंधित अधिकारी नियमितपणे क्षेत्राला भेट देतील.
शहर आणि उपनगरामध्ये ६७ ठिकाणी पूजेची व्यवस्था
मुंबई : उत्तर भारतीयांच्या २७ व २८ ऑक्टोबर रोजी साजऱ्या होणाऱ्या छठ पूजा उत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये ६७ ठिकाणी छठ पूजेसाठी नियोजन करण्यात आले आहे, तर स्वच्छ व सुरक्षित अशा १४८ कृत्रिम विसर्जन स्थळांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबई मनपा आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार छठ पूजेसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. छठ पूजा आयोजित करणाऱ्या संस्था/मंडळांना आवश्यक परवानग्या व समन्वयासाठी एक खिडकी प्रणालीद्वारे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित पोलीस व वाहतूक विभागाशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक विभागात समन्वय अधिकारी नेमण्यात आले आहेत.
समुद्रकिनाऱ्यावर तसेच नैसर्गिक जलाशये, तलाव इत्यादी ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी, मुंबई शहर आणि पूर्व व पश्चिम उपनगरे मिळून सुमारे ६७ ठिकाणी छठ पूजेसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच स्वच्छ व सुरक्षित असे एकूण १४८ कृत्रिम विसर्जन तलाव/टाक्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वाधिक तलाव व टाक्या या घाटकोपर परिसरात (एन विभाग) ४४, दहिसर (आर उत्तर विभाग) २२ तर कांदिवली परिसरात (आर दक्षिण विभाग) १६ इतक्या आहेत. यासह उर्वरित ठिकाणी देखील कृत्रिम तलाव व टाक्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
सर्व ठिकाणी पाण्याची उपलब्धताही सुनिश्चित करण्यात आली आहे, तर यावेळेस कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात आली आहे.