कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणींत वाढ; 'विनोदाच्या नादात विकृती केल्यास थेट कारवाई', गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा 
मुंबई

कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणींत वाढ; 'विनोदाच्या नादात विकृती केल्यास थेट कारवाई', गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा

कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून गृह विभागाकडून यापूर्वीच्या त्याच्या सर्व व्हिडीओंची चौकशी होणार आहे. यापूर्वी अपलोड केलेल्या व्हिडीओ कंटेंटची सायबर पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. प्रणित मोरेच्या शोमधील '३७० रुपयांची बिर्याणी' आणि डॉक्टर सेजल पवार या तरुणीचे मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सबाबतचे अश्लील वक्तव्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले.

Swapnil S

मुंबई : कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असून गृह विभागाकडून यापूर्वीच्या त्याच्या सर्व व्हिडीओंची चौकशी होणार आहे. यापूर्वी अपलोड केलेल्या व्हिडीओ कंटेंटची सायबर पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. प्रणित मोरेच्या शोमधील '३७० रुपयांची बिर्याणी' आणि डॉक्टर सेजल पवार या तरुणीचे मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्ट्सबाबतचे अश्लील वक्तव्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. त्यामुळे देशभरात मोठा गदारोळ झाला असून संतापाची लाट उसळली आहे. अशातच डॉ. सेजल पवारने केईएम रुग्णालय प्रशासनाकडे लेखी माफीनामा सादर केला. याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या समितीने संबंधित कॉमेडी शोचे संपूर्ण रेकॉर्डिंग पाहून विद्यार्थिनीशी सविस्तर चर्चा केली असल्याची माहिती आहे.

दुसरीकडे प्रणित मोरेने देखील सोशल मीडियातून माफी मागितली आहे. माझी ती सर्वात मोठी चूक होती, मला माफ करा आणि पुन्हा एक संधी द्या, मी नक्कीच चांगला व्यक्ती बनून दाखवेन, असे तो म्हणाला. असे असताना आता कॉमेडियन प्रणित मोरे याच्या अडचणी वाढणार असून गृहविभागाकडून त्याच्या यापूर्वीच्या सर्व व्हिडीओंची चौकशी होणार आहे.

कंटेंटची सायबर पोलिसांकडून सखोल चौकशी

यापूर्वी अपलोड केलेल्या व्हिडीओ कंटेंटची सायबर पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली. 'प्रेक्षक वाढवण्याच्या नादात वादग्रस्त कंटेंट अपलोड केला, तर यापुढे नक्कीच कारवाई होणार', असे भोयर यांनी सांगितले. 'विनोद न करता विकृती करत असाल, तर थेट कारवाई होईल', असा सज्जड दम गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिला. ३७० च्या बिर्याणीचे वादग्रस्त वक्तव्य करणारा आणि डॉ. सेजल पवारवर कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले. डॉक्टर सेजल पवारने आपल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी माफी मागितली असली, तरी हे प्रकरण त्यांना भोवणार असेच दिसते आहे.

सोशल मीडियावर संतापाची लाट

हा वाद प्रणित मोरेच्या शोमधील एका व्हायरल व्हिडीओमुळे सुरू झाला. या व्हिडीओमध्ये हिमांशू जांगडा नावाच्या तरुणाने एका महिलेला डेटवर गेल्याचा अनुभव सांगितला होता. 'चिकन बिर्याणीवर ३७० रुपये खर्च केले, आता वसूल तर करावे लागतील ना', असे म्हणत त्याने त्या खर्चाच्या बदल्यात तरुणीकडून शारीरिक जवळीक अपेक्षित असल्याचे सूचित करणारे वक्तव्य केले.

प्रणित मोरेला मागावी लागली माफी

वाद केवळ हिमांशूपुरता मर्यादित राहिला नाही. शोदरम्यान त्या वक्तव्याला विरोध न केल्यामुळे आणि संबंधित क्लिप सोशल मीडियावर शेअर केल्याच्या आरोपांमुळे प्रणित मोरेलाही मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले. अशा आक्षेपार्ह वक्तव्यांना कॉमेडीच्या नावाखाली थारा देऊ नये, असेही नेटकऱ्यांनी म्हटले. सोशल मीडियावर होणाऱ्या या सगळ्या प्रकारामुळे प्रणित मोरेला माफी मागावी लागली. हा वाद तरीही इतका वाढला की त्याने थेट इंस्टाग्राम अकाऊंटच बंद करून टाकले.

सेजल यांच्या वक्तव्याची गंभीर दखल

केईएम रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने सेजल यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी रुग्णालय आणि महाविद्यालय प्रशासनाकडून दोन सदस्यीय चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित व्हिडीओ तसेच त्यातील कथित वक्तव्यांची या समितीकडून पडताळणी केली जाते आहे. शक्य तितक्या लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना चौकशी समितीला देण्यात आल्या आहेत.

Mumbai : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मध्यरात्रीचा ब्लॉक; हार्बर मार्गावर रविवारी दिवसाचा मेगाब्लॉक

Mumbai : एअर इंडिया इमारतीला मिळणार नवी झळाळी; नूतनीकरणासाठी १८१ कोटी मंजूर

अविश्वास ठरावासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यकच; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाला दिलासा

Mumbai : ब्रेक, स्टेअरिंग नीट हाताळा! दुचाकीस्वारांना क्रॉस करू नका! सुमारे ७ हजारांहून अधिक चालकांचे 'बेस्ट काऊन्सलिंग'

काँग्रेसचे १७ जूनला देशव्यापी आंदोलन