Photo : X (@VijayWadettiwar)
मुंबई

विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाकरिता पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सोमवारी दुपारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली.

Swapnil S

मुंबई : विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाकरिता पाठिंबा मिळवण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी सोमवारी दुपारी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. यावेळी ठाकरे यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसला पाठिंबा देण्याची मागणी करण्यात आली.

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात आणि पक्षाचे उपनेते अमीन पटेल यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत दीर्घ काळ चर्चा केली. दरम्यान, शिवसेना नेते अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट रोजी संपला आहे. त्यामुळे हे पद आता काँग्रेसकडे जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, काँग्रेसकडून माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नावावर जवळपास एकमत झाले आहे.

“आज अनेक विषयांवर चर्चा झाली. भविष्यात होणाऱ्या निवडणुका कशा पद्धतीने होतील, यावर बोलणी झाली. तसेच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरही चर्चा करण्यात झाली. शरद पवार दिल्लीत असल्यामुळे ते मुंबईत आल्यावर आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विरोधी पक्षनेतेपदाचा दावा ठोकणार आहोत. या पदासाठी सतेज पाटील यांचे नाव आघाडीवर असले तरी दिल्लीतून आमच्या हायकमांडकडून जो निर्णय घेतला जाईल, त्यानुसार पुढील दिशा ठरवली जाईल,’’ असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

मनसेबाबत अंतिम निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा!

मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येत असेल तर काँग्रेस पक्ष मविआसोबत राहणार का? याबाबत राज्यातील काँग्रेसचे नेते पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच स्थानिक स्वराज्य निवडणुकांसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. सध्या महाविकास आघाडीमध्ये ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या तीन पक्षांचा समावेश आहे. मात्र, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाकरे गट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत युती करणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे ठाकरे-मनसे युती झाल्यास, काँग्रेसची भूमिका काय असेल, याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

विधान परिषदेच्या सभापतींचीही घेतली भेट

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा कंदिल दाखवताच, कोणताही वेळ वाया न घालवता काँग्रेस नेत्यांनी तातडीने विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासोबतची बैठक संपल्यानंतर लगेचच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांनी राम शिंदे यांची भेट घेत रिक्त असलेल्या विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा केल्याचे समजते.

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव

Gen-Z पुढे अखेर नेपाळ सरकार कोसळलं; 'या' दोन मिलेनियल नेत्यांनी नेपाळचे पालटले चित्र

नेपाळमध्ये परिस्थिती चिघळली! PM पाठोपाठ राष्ट्रपतींचाही राजीनामा; आंदोलकांनी परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्र्यांसह माजी PM ना पळवून पळवून मारले

GenZ Protests : नेपाळमध्ये वातावरण तापले; पंतप्रधान ओलींचा राजीनामा, आंदोलकांसमोर अखेर माघार

करिश्मा कपूरच्या मुलांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; वडिलांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये वाट्याची मागणी