मुंबई

कोरोना मृतांच्या संख्येत वाढ,आठवडाभरात इतर जिल्ह्यांमध्ये ७० टक्के मृत्यू

प्रतिनिधी

मुंबईत कोरोनाबाधितांच्या प्रमाणात काही अंशी घट झाली असली तरी इतर जिल्ह्यांमध्ये मृतांचे प्रमाण मात्र जवळपास दुपटीहून अधिक वाढले आहे. राज्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या मृतांमध्ये सुमारे ७० टक्के मृत्यू हे इतर जिल्ह्यांमध्ये झाले आहेत.

मुंबईत जूनच्या शेवटच्या आठवड्यातच कोरोनाचा प्रसार कमी व्हायला सुरुवात झाली होती. परंतु या काळात मृतांच्या संख्येत काही अंशी वाढ झाल्याचे निदर्शनास आले. जुलैपासून मात्र मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येसह मृतांच्या संख्येतही काही अंशी घट होत असल्याचे आढळले आहे. मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या आता ७०० पर्यंत खाली गेली आहे. परिणामी, बाधितांचे प्रमाणही सहा टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे.

मुंबईत चौथी लाट उच्चांकावर गेली, त्यावेळी राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रसार व्हायला सुरुवात झाली. मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आला तरी राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या आता तीन हजारांवर स्थिर झाली आहे. राज्यात बाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही २० हजारांच्या खाली गेली आहे. परंतु दुसरीकडे मृतांच्या संख्येत मात्र जवळपास दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. जूनच्या चौथ्या आठवड्यात राज्यभरात १४ मृत्यू नोंदले गेले. परंतु जुलैमध्ये मृतांचे प्रमाण वाढले आहे. १ ते ८ जुलै या काळात राज्यभरात ३९ मृत्यू झाले आहेत.

जूनमध्ये राज्याच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे सुमारे ७८ टक्के मृत्यू हे मुंबईत नोंदले जात होते. परंतु आता हे प्रमाण जवळपास उलट झाले आहे. जुलैमध्ये राज्यातील एकूण मृतांपैकी ३० टक्के मृत्यू मुंबईत, तर ७० टक्के अन्य जिल्ह्यांमध्ये झाले आहेत. यामध्ये ठाणे, रायगड, वसई-विरार, पुणे, रत्नागिरी, औरंगाबाद, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात जूनमध्ये सरासरी दैनंदिन दोन मृत्यू नोंदले जात होते. जुलैमध्ये हे प्रमाण सरासरी पाचवर गेले आहे. शनिवारी तर राज्यात आठ मृतांची नोंद झाली. चौथ्या लाटेतील हे सर्वाधिक मृत्यू आहेत.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल आज

गुजरातमध्ये ‘जुनं फर्निचर’ची कथा! मुलाने संपर्क तोडल्याने आई-वडिलांची आत्महत्या;आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी

मध्य रेल्वेवर प्लॅटफॉर्म विस्तारासाठी दोन दिवस रात्रकालीन 'पॉवरब्लॉक'; 'या' लोकल रद्द , लांबपल्ल्याच्या गाड्यांनाही फटका

बँक कर्मचाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा झटका, बिनव्याजी कर्जावर भरावा लागणार कर

आहारातील गडबड बेततेय जीवावर, ‘आयसीएमआर’चा खळबळजनक अहवाल