कोरोनाची चौथी लाट रोखण्यात पालिकेला यश आल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला असतानाच पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. १ ते १० जुलैदरम्यान मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, कावीळ, गॅस्ट्रो व स्वाईन फ्ल्यूचा झपाट्याने प्रसार होत आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना आटोक्यात आला असला तरी साथीच्या आजारांचे टेन्शन वाढले आहे.
पावसाळ्यात उद्भवणारे साथीचे आजार पसरण्याचा धोका वाढला आहे. दरम्यान, लेप्टोचा धोका टाळण्यासाठी ७ ते ९ जुलै या तीन दिवसांत तीन लाख ४४ हजार २९१ घरी रोगप्रतिबंधक औषधांचे वाटप करण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. मुंबईत पावसाला सुरुवात झाली असून, पावसाळ्यात पसरणाऱ्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. १ ते १० जुलै या १० दिवसांत मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रो, कावीळ व स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, पावसाळी आजार रोखण्यासाठी मलेरिया, डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होणार नाही, यासाठी पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी मुंबईकरांना केले आहे.