मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (नॅशनल पार्क) अतिक्रमणे हटवण्यात अपयशी ठरलेल्या राज्य सरकारची उच्च न्यायालयाने झाडाझडती घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर या परिसरात बेकायदा बांधकामे कशी काय उभी राहिली? या उद्यानाभोवती कुंपण का नाही घातले? सरकारच्या नाकर्तेपणामुळेच नॅशनल पार्कमध्ये अनधिकृत बांधकामे उभी राहिली असून केवळ बेकायदेशीरच नव्हे तर या ठिकाणी बाजार भरत आहे, अशा शब्दात राज्य सरकारला खडेबोल सुनावले. बेकायदेशीर बांधकामे तातडीने हटवा, असा आदेश देताना भविष्यात याठिकाणी बांधकामे उभी राहणार नाहीत यासाठी कुंपण घालण्याचे व खबरदारी घेण्याचे आदेशही खंडपीठाने सरकारला दिले.
पर्यावरण दृष्टीने संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणार्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्या काही वर्षात बेकायदेशीर बांधकामे वाढली असून वाढत्या नागरी वस्त्यांमुळे पर्यावरणाचा र्हास वाढत चालला आहे. याप्रकरणी न्यायालयाने येथील बांधकामे हटविण्याचे आदेश दिले होते.मात्र या आदेशाची पूर्तता न झाल्याने कंजर्वेशन ट्रस्ट या संस्थेने उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणारे रहिवासी पुनर्वसनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.