मुंबईः छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता लांब पल्ल्याच्या गाड्यांची माहिती अधिक सुलभतेने मिळू शकणार आहे. मध्य रेल्वेने संपूर्ण स्टेशनवर नवीन 'आयपी-आधारित एलईडी व्हिडीओ डिस्प्ले सिस्टीम' सुरू केली आहे.
या डिजिटल स्क्रीनवर पुढील चार तासांत येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांची रिअल-टाइम (अद्ययावत) माहिती पाहायला मिळेल. यामुळे प्रवाशांना चौकशी कक्ष किंवा प्लॅटफॉर्मवरील बोर्डवर अवलंबून न राहता अचूक माहिती मिळण्यास मदत होईल.
स्टेशनच्या मुख्य ठिकाणी बसवलेल्या या हाय-रिझोल्यूशन एलईडी स्क्रीनवर एकावेळी १२ गाड्यांची माहिती प्रदर्शित केली जाते. यात गाडीचा क्रमांक, नाव, नियोजित आगमन किंवा प्रस्थान वेळ आणि प्लॅटफॉर्म क्रमांक समाविष्ट आहे. येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांसाठी स्वतंत्र डिस्प्ले लावण्यात आल्यामुळे, विशेषतः गर्दीच्या वेळी प्रवाशांना आवश्यक ती माहिती पटकन शोधणे सोपे जाते.
ही प्रणाली राष्ट्रीय ट्रेन चौकशी प्रणालीशी जोडलेली आहे. ज्यामुळे गाड्यांची माहिती दर पाच मिनिटांनी आपोआप अपडेट होते. यामुळे प्रवाशांना गाड्यांचे उशीर, प्लॅटफॉर्ममधील बदल आणि वेळापत्रकाबाबतचे अपडेट्स वेळेवर मिळतात. लाईव्ह जलद आणि अधिक विश्वासार्ह माहिती देऊन प्रवाशांची सोय सुधारणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, असे रेल्वेने सांगितले.
या प्रकल्पात आयपीआधारित 'ट्रेन ऑल-इन-वन व्हिडिओ डिस्प्ले' सिस्टीमचा वापर केला गेला आहे. यामुळे स्टेशनवरील सर्व डिजिटल बोर्डवर एकाच वेळी समान माहिती अपडेट होते.
बहुभाषिक मजकूर, रंगीत ग्राफिक्सचा वापर
नया नवीन डिस्प्लेमध्ये २.५ मिमी आणि ५ मिमी पिक्सेल पिच असलेले एलईडी पॅनेल्स वापरले आहेत. ज्यामुळे लांबूनही स्क्रीनवरील मजकूर स्पष्ट दिसतो. तसेच, हे स्क्रीन बहुभाषिक मजकूर, रंगीत ग्राफिक्स आणि व्हिडीओ प्रदर्शित न करण्यास सक्षम असल्याने, विविध भाषिक पार्श्वभूमी असलेल्या प्रवाशांसाठी प्रवासाची माहिती समजणे अधिक सोपे होते.