दादर कबूतरखाना 'अ‍ॅक्रेलिक शीट'ने होणार बंदिस्त; खाद्य टाकण्यास पूर्णतः प्रतिबंध; मुंबई महापालिकेचा निर्णय छाया सौ. सलमान अन्सारी
मुंबई

दादर कबूतरखाना 'अ‍ॅक्रेलिक शीट'ने होणार बंदिस्त; खाद्य टाकण्यास पूर्णतः प्रतिबंध; मुंबई महापालिकेचा निर्णय

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बंदिस्त करण्यात आलेल्या दादर येथील ऐतिहासिक कबूतरखान्यावरील ताडपत्री लवकरच हटविण्यात येणार आहे. त्याऐवजी संपूर्ण कबूतरखाना पारदर्शक आणि मजबूत अ‍ॅक्रेलिक शीटने झाकण्यात येणार आहे. त्यामुळे वास्तूची मूळ ओळख कायम राहणार आहे. त्याचवेळी कबूतरांचा प्रवेश तसेच नागरिकांकडून खाद्य टाकण्यासही पूर्णतः प्रतिबंध केला जाणार आहे.

गिरीश चित्रे

मुंबई : उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बंदिस्त करण्यात आलेल्या दादर येथील ऐतिहासिक कबूतरखान्यावरील ताडपत्री लवकरच हटविण्यात येणार आहे. त्याऐवजी संपूर्ण कबूतरखाना पारदर्शक आणि मजबूत अ‍ॅक्रेलिक शीटने झाकण्यात येणार आहे. त्यामुळे वास्तूची मूळ ओळख कायम राहणार आहे. त्याचवेळी कबूतरांचा प्रवेश तसेच नागरिकांकडून खाद्य टाकण्यासही पूर्णतः प्रतिबंध केला जाणार आहे.

कबूतरांना खाद्य घालण्यामुळे सार्वजनिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामांच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने कारवाईचे निर्देश दिल्यानंतर मुंबई महापालिकेने ऑगस्ट २०२५ मध्ये दादरचा कबूतरखाना ताडपत्रीने पूर्णपणे बंदिस्त केला होता. या निर्णयानंतर काही सामाजिक व धार्मिक संघटनांनी त्याला विरोधही दर्शविला होता.

मात्र ताडपत्रीमुळे या ऐतिहासिक वास्तूचे स्वरूप पूर्णपणे झाकले गेल्याने परिसराच्या सौंदर्यावर परिणाम होत असल्याची बाब महापालिकेच्या निदर्शनास आली. त्यामुळे कबूतरखान्याची ओळख अबाधित ठेवण्यासाठी आता ताडपत्रीऐवजी पारदर्शक व न गंज पकडणाऱ्या अॅक्रेलिक शीट बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव जी-उत्तर विभागाने तयार करून महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठविल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

अ‍ॅक्रेलिक शीटमुळे बाहेरून संपूर्ण कबूतरखाना स्पष्टपणे दिसेल, मात्र त्यामध्ये कबूतरांना प्रवेश करता येणार नाही किंवा कोणालाही आत खाद्य टाकता येणार नाही, अशी रचना करण्यात येणार आहे. अ‍ॅक्रेलिक शीट ही काचेपेक्षा हलकी, अधिक मजबूत आणि गंजरोधक असल्याने तिचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या नियोजनानुसार कबूतरखान्याच्या आतील भागाची स्वच्छता करून तेथे शोभेच्या वनस्पतींच्या कुंड्या ठेवण्यात येणार आहेत. तसेच अनेक वर्षांपासून बंद असलेले कारंजे पुन्हा सुरू करण्याचाही प्रयत्न करण्यात येणार आहे.

९२ वर्षांचा इतिहास लाभलेली वास्तू

दादरचा कबूतरखाना हा 'ग्रेड-२' वारसा वास्तूंमध्ये समाविष्ट असून त्याला ९२ वर्षांहून अधिकचा इतिहास आहे. १९३३ मध्ये येथे पाण्याचे कारंजे उभारण्यात आले होते. कालांतराने नागरिकांनी येथे कबूतरांना दाणे टाकण्यास सुरुवात केली आणि ही जागा पुढे 'दादर कबूतरखाना' म्हणून संपूर्ण मुंबईत परिचित झाली. आजही ही वास्तू दादरची एक महत्त्वाची ओळख मानली जाते.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली