मुंबई

दाऊदचा हस्तक रियाज भाटीला केली अटक

प्रतिनिधी

अंधेरीतील एका व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी देऊन त्याच्याकडून महागड्या कारसह साडेसात लाख रुपयांची खंडणीवसुली केल्याप्रकरणी रियाज सिराज भाटी याला सोमवारी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. रियाज हा दाऊदचा हस्तक असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने १ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यात सलीम इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रूट यालाही आरोपी दाखविण्यात आले असून, तो अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा साडू आहे. सलीम सध्या ‘एनआयए’च्या कोठडीत असल्याने लवकरच त्याचा ताबा खंडणीविरोधी पथकाचे अधिकारी घेणार आहेत.

यातील तक्रारदार व्यावसायिक अंधेरीतील वर्सोवा-यारी रोडवर राहतात. एक वर्षापूर्वी त्यांची रियाजशी ओळख झाली होती. रियाजने त्याची अनेक नामांकित व्यक्तीशी ओळख असून, या ओळखीचा त्यांच्या व्यवसायासाठी फायदा होईल, असे सांगून त्यांच्याशी जवळीक निर्माण केली होती. फेब्रुवारी महिन्यात रियाजच्या वाढदिवसाला ते विलेपार्ले येथील एका हॉटेलमध्ये गेले होते. तिथेच रियाजने त्यांची ओळख सलीम फ्रूटशी करून दिली होती. सलीम हा छोटा शकीलचा साडू असून त्याचे सर्व व्यवहार सलीम हाच पाहत असल्याचे सांगितले होते. त्यांना पत्त्यांचा जुगार खेळण्याची सवय होती, त्यासाठी ते माटुंगा येथील एका क्लबमध्ये नियमित जात होते. तिथेच त्यांच्यासोबत सलीम हादेखील जात होता. काही महिन्यांनंतर सलीमने त्यांना पत्त्यांच्या जुगारातून त्याला ६२ लाख रुपये येणे बाकी आहे, असे सांगितले; मात्र त्यांनी त्याच्याकडून कधीच पैसे घेतले नसल्याचे सांगितले. यावेळी सलीमने मी छोटा शकीलचा साडू आहे, जुगारात झालेला हिशोब बरोबर आहे. त्यामुळे त्याला पैसे द्यावे लागतील, नाहीतर परिणाम वाईट होतील, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने त्यांच्याकडील एक महागडी कारसह साडेसात लाख रुपये खंडणी स्वरूपात घेतले होते. उर्वरित पैशांसाठी रियाज आणि सलीम त्यांना सतत धमक्या देत होते. त्यांना खंडणीसाठी मेसेज पाठवित होते. याचदरम्यान ऑगस्ट महिन्यात सलीमला राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) एका गुन्ह्यांत अटक केली. यावेळी रियाजने सलीमने त्यांच्याकडे कधीच पैशांची मागणी केली नाही, त्यांची कार घेतली नाही, असे सांगण्यासाठी दबाव आणला.

सलीम छोटा शकीलचा साडू आहे, त्याचे कोणीही काहीही करणार नाही. तसेच आपण एनआयए आणि रॉसाठी काम केले आहे; मात्र त्याने त्यांच्याविरुद्ध साक्ष दिल्यास त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना महागात पडेल, अशी धमकी दिली. त्यामुळे त्यांनी या दोघांविरुद्ध पोलिसांत तक्रार केली नव्हती; मात्र या दोघांकडून सतत धमकी येत असल्याने त्यांनी सोमवारी वर्सोवा पोलिसांना घडलेला प्रकार सांगून रियाज आणि सलीमविरुद्ध तक्रार केली.या तक्रारीनंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला. गुन्हा दाखल होताच रियाजला अंधेरीतील वर्सोवा-यारी रोड परिसरातून पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर त्याला मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. लवकरच सलीमचा ताबा ‘एनआयए’कडून घेण्यात येणार असून त्याचीही चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम

थांबा... पुढे धोका, आज समुद्र खवळणार; हवामान विभागाचा 'अलर्ट'; समुद्रात जाणे टाळा, पालिकेचे आवाहन

भारतीय नौदल बांधणार ‘एआयपी’ तंत्रज्ञानाने पाणबुड्या; ६० हजार कोटींचा प्रकल्प!

IPL 2024: चेन्नईची प्ले-ऑफसाठी झुंज,बेभरवशी पंजाब किंग्जविरुद्ध आज लढत!

एच. डी. रेवण्णा एसआयटीच्या ताब्यात,राहुल गांधी यांचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना पत्र!