जोगेश्वरी माता मंदिर व लेण्यांची दुरवस्था; सांडपाण्यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी; गर्दुल्ले, मद्यपींचा वाढता उपद्रव X - @truejainology
मुंबई

जोगेश्वरी माता मंदिर व लेण्यांची दुरवस्था; सांडपाण्यामुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी; गर्दुल्ले, मद्यपींचा वाढता उपद्रव

राष्ट्रीय स्मारक असलेल्या ऐतिहासिक जोगेश्वरी लेण्या आणि जोगेश्वरी माता मंदिराच्या आसपासच्या परिसराची शासनाच्या उदासिनतेमुळे पार दुरवस्था झाली आहे. या परिसरात झोपड्यांमधील सांडपाणी झिरपत असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली असून लेण्यांची पडझड सुरू आहे. त्यातच गर्दुल्ले, मद्यपींचा वावर वाढल्याने या ठिकाणी येणाऱ्या भाविक व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Swapnil S

तेजस वाघमारे/ मुंबई

राष्ट्रीय स्मारक असलेल्या ऐतिहासिक जोगेश्वरी लेण्या आणि जोगेश्वरी माता मंदिराच्या आसपासच्या परिसराची शासनाच्या उदासिनतेमुळे पार दुरवस्था झाली आहे. या परिसरात झोपड्यांमधील सांडपाणी झिरपत असल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली असून लेण्यांची पडझड सुरू आहे. त्यातच गर्दुल्ले, मद्यपींचा वावर वाढल्याने या ठिकाणी येणाऱ्या भाविक व पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या मंदिर व लेण्यांच्या देखभाल-दुरुस्तीकडे पुरातत्त्व खात्याने आणि मुंबई महापालिकेने तत्काळ लक्ष देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

जोगेश्वरी लेण्यांमध्ये वीस खांबांवर आधारित भव्य सभागृह आहे. तसेच जोगेश्वरी मातेचे मंदिर आहे. लेण्यांच्या दक्षिण बाजूस मारुती मंदिर तर पश्चिमेकडील बाजूस शिव मंदिर आणि वरील भागात दत्त मंदिर आहे. या मंदिरात पुजारी असलेले पाटील कुटुंबीय गेल्या अनेक पिढ्यांपासून जोगेश्वरी मातेची पूजा करीत आहेत. या मंदिरामध्ये नवरात्रीत आणि महाशिवरात्रीला लाखो भाविक दर्शनासाठी येत असून, वास्तू रचनेचा उत्तम नमुना असलेल्या या मंदिरामध्ये जोगेश्वरी देवीच्या स्वयंभू पादुका आहेत.

जोगेश्वरी लेणी जमिनीखाली असल्याने लेण्यांवरील जमिनीवर अतिक्रमणे झाली होती. या अतिक्रमणावर पुरातत्व विभागाने कारवाई केली असली तरी या घरांचा राडारोडा, डेब्रीज तेथेच पडून असल्याने लेणीच्यावरील भाग खंडहर बनला आहे. यामुळे दिवस आणि रात्री गर्दुल्ले, मद्यपींनी हा परिसर व्यापला आहे. लेण्यांना व मंदिराला चोख सुरक्षा नसल्याने बेकायदा कामांसाठी अनेकांनी हे ठिकाण बैठकीचा अड्डा बनवला आहे. धक्कादायक बाब म्हणजे लेण्यांमधील अडगळीच्या ठिकाणी आक्षेपार्ह साहित्य आढळल्याने भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. लेण्याजवळील झोपड्यांचे सांडपाणी लेण्यांमध्ये साचत असल्याने तेथे दुर्गंधी पसरली आहे. तसेच लेण्यांमध्ये पाणी गळती होत असल्याने त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, या लेण्यांना सुरक्षा रक्षक उपलब्ध करावा की नाही हे वरिष्ठ अधिकारीच सांगू शकतात, असे पुरातत्व विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

जोगेश्वरी लेणीचे सहाव्या शतकात उत्खनन

जोगेश्वरी पूर्वेकडील जोगेश्वरी लेण्यांचे उत्खनन हे ६ व्या शतकात केले गेले. ही लेणी वाकाटक व वाकाटकोत्तर स्थापत्य शैलीने प्रभावित झालेली दिसतात. या लेण्यांतील प्रतिमांमध्ये लकुलीश, कल्याण सुंदरमूर्ती, द्यूतक्रीडा, रत शिव- पार्वती, नटराज, रावणानुग्रह मूर्ती, आयुध- पुरुष, द्वारपाल इत्यादी आहेत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. ही लेणी जमिनीखाली असून प्राचीन कलात्मकतेचे दर्शन घडवतात. लेण्यांमधील मूर्ती भग्नावस्थेत असून त्यांचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने त्याचा अंदाज लावता येणे कठीण बनले आहे.

प्रशासनाचे अद्याप दुर्लक्ष

लेण्यांवरील अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली. मात्र, बांधकामाचे डेब्रीज उचलण्यात आले नाही. झोपड्यांमधील तुटलेल्या पाईपचे सांडपाणी लेण्यांमध्ये जात आहे. याबाबत महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असली तरी अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही.

- प्रदीप गांधी (रहिवाशी)

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा

इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते! फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध

Maratha Reservation Protest : मुंबईच्या रस्त्यांवर संगीत, नृत्य आणि कठपुतळीचा नाचही!