मुंबई

प्रत्युत्तर सभेत विकासाची चर्चा! बीडसंदर्भात अजितदादांकडून मोठ्या घोषणांची शक्यता

नवशक्ती Web Desk

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी १७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये सभा घेतली होती. त्या सभेला प्रत्युत्तर म्हणून अजितदादा गटाकडून येत्या २७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये जाहीर सभा घेण्यात येणार आहे, मात्र हे प्रत्युत्तर विकासकामांनी देण्यात येणार आहे. यात परस्परांवर टीका होणार नाही. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार तयारीलाही लागले आहेत. बीड जिल्ह्यातील विकासकामे, दुष्काळी परिस्थिती, विविध प्रस्तावित जलप्रकल्प, वीजपुरवठा व महावितरणकडील अन्य समस्यांचे निराकरण आदी विषयी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी अजितदादांनी कृषी मंत्री धनंजय मुंडेंसह बीडमधील लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. बीड जिल्ह्यातील समस्यांवरील उपाययोजनांसाठी सर्व संबंधित विभागांच्या स्वतंत्र बैठका घेऊन तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. यामुळे प्रत्युत्तर सभेत अजितदादांकडून बीडमधील विकासकामांसंदर्भात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

अजितदादांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन तट पडले आहेत. शरद पवार विरुद्ध अजित पवार असे राष्ट्रवादीत चित्र आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. शरद पवार यांनी १७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये सभा घेतली होती. बीड जिल्हा राखणे हे अजितदादा गटासमोरचे उद्दिष्ट आहे. स्वत: कृषी मंत्री धनंजय मुंडे हे बीडचे आहेत. त्यामुळे या सभेला प्रत्युत्तर म्हणून अजितदादा गटाकडून २७ ऑगस्ट रोजी बीडमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे, मात्र या सभेसाठी अजितदादांनी नवीन स्ट्रॅटेजी आखली आहे. जाहीर सभेमध्ये कोणत्याही घटकांवर टीका न करता बीड जिल्ह्यातील विकासकामांचा लेखाजोखा मांडण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

बीडच्या विकासकामांवर बैठक

बीड जिल्ह्यातील विकासकामे, दुष्काळी परिस्थिती, विविध प्रस्तावित जलप्रकल्प, वीजपुरवठा व महावितरणकडील अन्य समस्यांचे निराकरण आदी विषयी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडेंसह लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. धनंजय मुंडे यांच्यासह बीड जिल्ह्यातील आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार संजय दौंड, राजकिशोर मोदी आदींची या बैठकीला उपस्थिती होती. या सर्वांनीच बीड जिल्ह्यातील विविध प्रलंबित कामांसह अन्य प्रस्तावित व तातडीची कामे तसेच दुष्काळी परिस्थितीसंदर्भात माहिती दिली. यावर उपाययोजना करण्यासाठी सर्व संबंधित विभागाच्या स्वतंत्र बैठका घेऊन निर्णय घेण्याचे अजितदादा पवार यांनी निर्देश दिले आहेत.

दरम्यान, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनात महापारेषण व संचालन विभागाकडील प्रलंबित विषयासंदर्भात बैठक संपन्न झाली. त्याही बैठकीस बीड जिल्ह्यातील आजी, माजी आमदार व प्रमुख लोकप्रतिनिधी उपस्थित होते. माजलगाव धरणातून परळी औष्णिक विद्युत केंद्रास पाइपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यासंदर्भात देखील धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात बैठक पार पडली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस