राज्यपालांच्या सूचनेमुळे सुरू झालेला मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाच्या नावाचा वाद आता पुन्हा राज्यपालांच्या कोर्टात गेला आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी सोमवारी छात्रभारती आणि सर्व समविचारी संघटना प्रतिनिधींशी बोलताना या वसतिगृहाला छत्रपती शाहू महाराजांचे नाव देण्याची विद्यार्थ्यांची मागणी आणि त्यांच्या तीव्र भावना राज्यपालांपर्यंत लेखी पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे.
मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृहाला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव द्या, अशी राज्यपालांनी सूचना केली होती. त्याला आक्षेप घेत छात्र भारतीचे कार्याध्यक्ष रोहित ढाले यांनी छत्रपती शाहू महाराजांचे नाव दिले गेले पाहिजे, अशी मागणी केली होती. छात्र भारतीसह सर्वच समविचारी संघटनांनी ही मागणी उचलून धरली आणि सावकारांच्या नावाला विरोध केला; मात्र मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सावरकरांच्या नावाचा ठराव केल्यामुळे छात्र भारतीसह डाव्या आणि आंबेडकरी विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या होत्या. या सर्व विद्यार्थी संघटनांनी आजच विद्यापीठात नामांतर परिषद घेण्याचे जाहीर केले होते. या असंतोषाची दखल घेत सोमवारी सकाळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांनी या विद्यार्थी प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले होते.