मुंबई

ड्रग्ज तस्कर टोळीचा गुन्हे शाखेकडून पर्दाफाश

विविध परिसरातून महिलेसह नऊजणांना अटक व कोठडी

नवशक्ती Web Desk

मुंबई : मुंबई शहरात ड्रग्ज तस्करी करणाऱ्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका महिलेसह नऊ जणांना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. रईस अमीन कुरेशी, साहिल रमजानअली खान ऊर्फ मस्सा, मोहम्मद अजमल कासम शेख, शमशुद्दीन नियाजउद्दीन शहा, इमरान अस्लम पठाण, मोहम्मद तौसिफ शौकतअली मन्सुरी, मोहम्मद इस्माईल सलीम सिद्धीकी, सर्फराज शाबीरअली खान ऊर्फ गोल्डन, सना शाबीरअली खान ऊर्फ प्रियांका अशोक कारकौर अशी या आरोपींची नावे आहेत.

या आरोपींकडून पोलिसांनी ७० लाख रुपयांचे ३५० ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, १ लाख ३५ हजारांचा ४५ ग्रॅम चरस, २६ लाख ६० हजारांच्या तीन कार, १७ लाख ८९ हजारांची कॅश, साडेतीन लाखांचे दहा मोबाईल असा १ कोटी १९ लाख २९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई शहरात एमडीसह इतर ड्रग्ज विक्री करणारी एक टोळी कार्यरत असून या टोळीतील काही आरोपी मुलुंड टोलनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या डिलीव्हरीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती. बुधवारी दोन कारमधून आठ जण तिथे आले असता, त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्यासह कारची झडती घेतल्यानंतर पोलिसांना ड्रग्जचा साठा सापडला. ड्रग्ज विक्री करणारी एक सराईत टोळी असून या टोळीविरुद्ध अनेक ड्रग्जसहित फसवणुकीचे १३ गुन्हे दाखल आहेत.

संकटग्रस्त बळीराजाला २,२१५ कोटींची मदत; राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

बेकायदा होर्डिंगवर कारवाईसाठी लवकरच नोडल यंत्रणा उभारणार; भोसले समितीचा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला

‘शहद’ऐवजी आता फक्त ‘शहाड’ स्टेशन! राज ठाकरेंच्या संतापानंतर रेल्वे प्रशासनाचा झपाट्याने निर्णय

सव्वाअकरा लाखांचे पक्षी चोरणारे अटकेत; कर्जत पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

Mumbai Traffic : मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी, नागरिक हैराण