मुंबई

पत्राचाळ मनी लाँड्रिंग प्रकरणावरुन संजय राऊतांवर ईडीची कारवाई

प्रतिनिधी

पत्राचाळ मनी लाँड्रिंगप्रकरणी शिवसेना प्रवक्‍ते खासदार संजय राऊत यांना रविवारी अखेर ‘ईडी’ने ताब्‍यात घेतले. तब्‍बल नऊ तासांच्या चौकशीनंतर ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. संजय राऊत यांना ‘ईडी’चे अधिकारी घेऊन जाऊ नयेत, यासाठी शिवसैनिकांनी राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्‍थानाला अक्षरशः घेराव घातला होता. रविवारी दिवसभर हा हायव्होल्‍टेज ड्रामा सुरू होता. राऊत यांना ताब्‍यात घेऊन ‘ईडी’च्या कार्यालयात नेण्यात आले.

पत्राचाळ प्रकरणात ‘ईडी’ने संजय राऊत यांची चौकशी सुरू केली होती. त्‍यांना चौकशीसाठी तीन वेळा हजर राहण्यास समन्सही बजावण्यात आले होते; मात्र राऊत यांनी चौकशीत सहकार्य न केल्‍याचा ‘ईडी’ने आरोप ठेवला. अर्थातच, राऊत यांच्या वकिलांकडून असहकार्याचा आरोप फेटाळून लावण्यात आला आहे. रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्‍थानी ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांचे एक पथक पोहोचले. संजय राऊत यांच्यासोबत त्‍यांचे बंधू आमदार सुनील राऊत देखील होते. सकाळी ७ वाजल्‍यापासून तब्‍बल नऊ तास त्‍यांची चौकशी सुरू होती.

दरम्‍यानच्या काळात राऊत यांच्या निवासस्‍थानाबाहेर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमायला सुरुवात झाली होती. त्‍यात महिला शिवसैनिकांची संख्यादेखील लक्षणीय होती. सकाळी संजय राऊत यांनी ट्विट करत ‘आपण कोणत्‍याही चौकशीला घाबरणार नाही. कितीही दबाव आला तरी आपण शिवसेनेसोबतच राहू. बाळासाहेबांना स्‍मरून सांगतो की, मी कोणताही घोटाळा केलेला नाही,’ अशा भावना व्यक्‍त केल्‍या होत्‍या. भांडुपसोबतच राऊत यांच्या दादर येथील गार्डन कोर्ट या निवासस्‍थानीही ‘ईडी’चे अधिकारी पोहोचले होते. तिथेही कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

दुपारी ३च्या सुमारास संजय राऊत आणि सुनील राऊत यांनी त्‍यांच्या निवासस्‍थानाच्या खिडकीतून शिवसैनिकांना हात उंचावून दाखविला. तोपर्यंत निवासस्‍थानाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. राऊत यांना आपण घेऊन जाऊ देणार नाही, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली होती. त्‍यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्‍त ठेवण्यात आला होता. अखेर ४.४५च्या सुमारास संजय राऊत यांना खाली आणण्यात आले. खाली येताच राऊत यांनी शिवसैनिकांना शिवसेनेचे भगवे उपरणे फडकवून दाखविले. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी त्‍यांना ताब्‍यात घेऊन फोर्ट येथील कार्यालयात नेले. पत्राचाळ कथित जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना ताब्‍यात घेण्यात आले आहे. तब्‍बल एक हजार कोटींचा हा कथित जमीन घोटाळा असल्‍याचा आरोप आहे. राऊत यांनी त्‍यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत.

कर नाही त्‍याला डर कशाला - मुख्यमंत्री

“संजय राऊत यांना ताब्‍यात घेतल्‍यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘कर नाही त्‍याला डर कशाला’, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ईडी’ काय कारवाई करत आहे, याची आपल्‍याला कल्‍पना नाही; पण संजय राऊत हे महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत” असेही ते म्‍हणाले.

संजय राऊत यांच्या आईंना अश्रू अनावर

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले. मात्र, संजय राऊत यांना घेऊन जात असताना त्यांच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले होते. तसेच त्यांच्या परिवारातील इतर सदस्यही भावूक झाले होते. राऊत यांच्या घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी शिवसैनिकांनी ईडीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

लातूर आणि माढा मतदारसंघातील EVM मशीनमध्ये बिघाड; २० ते ४५ मिनिटे मतदान खोळंबले

मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका; रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत

मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी; म्हणाल्या...

'धर्मवीर'चे खरे दिग्दर्शक तुम्हीच मग चित्रपट खोटा कसा? राजन विचारे यांचे मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर उत्तर