शिवसेना ठाकरे गटातील माजी मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, (ED Summons sadanand kadam) ईडीने त्यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना मनी लाँडरिंगप्रकरणी ईडीने समन्स बजावला आहे. आता पुढच्या आठवड्यामध्ये त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. याचप्रकरणी जूनमध्ये अनिल परब यांची ३ दिवस कसून चौकशी करण्यात आली होती.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दापोलीत माजी अनिल परब यांनी बांधलेल्या बेकायदा रिसॉर्टबाबत अधिकाऱ्यांकडे अनेक तक्रारी केल्या होत्या. मार्चमध्ये प्राप्तिकर विभागाने यासंदर्भात छापे टाकले असता त्यांना काही कागदपत्रे मिळाली. या कागदपत्रांनुसार अनिल परब यांनी २०१७ मध्ये दापोली येथे एक कोटी रुपयांना जमीन खरेदी केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये नोंदणीकृत जमीन सदानंद कदम यांना १.१० कोटींना विकली असल्याची माहिती उघड झाली. रिसॉर्टच्याच उभारणीसाठी सुमारे ६ कोटी रुपये खर्च झाल्याचा आयकराचा अंदाज आहे.