प्रतिनिधी/मुंबई
महायुतीमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. घरात बसून, उंटावरून शेळ्या हाकणारा मी मुख्यमंत्री नाही. फेसबुक लाइव्ह करून राज्य चालत नाही. ज्यांचे आयुष्य कट, करप्शन आणि कमिशनमध्ये गेले, त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून उबाठा बसले आहेत. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार, असा सवाल करत ‘उबाठा’कडे अजेंडा पण नाही आणि स्वत:चा झेंडा पण नाही, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या सभेनंतर बाबुराव कदम कोहळीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी सभेला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोलीतील जनतेला धन्यवाद दिले. तापमान ४०पेक्षाही पुढे गेले आहे. तरीही शिवसैनिक तळपत्या उन्हात मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभाल मानले. ते म्हणाले की, “एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा इथे आला आहे. बाळासाहेबांचा ८० टक्के समाजकारणाचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत. यापूर्वी ज्या पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण होत होते. बाळासाहेबांच्या प्रखर विचारांचे खच्चीकरण झाले. बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देऊ लागले. मतदारांनी जो विश्वास दाखवला होता, त्याला बाजूला केले. एका बाजूला बाळासाहेबांचा फोटो दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून मते मागितली होती. जनतेने तुम्हाला कौल दिला. मात्र ज्यांचे आयुष्य कट, कमिशन, करप्शनमध्ये गेले त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ‘उबाठा’ बसलेत. त्यांच्याकडे अजेंडा नाही आणि झेंडाही नाही. विरोधकांना नरेंद्र मोदी यांच्याविषयीच्या द्वेषाने पछाडलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जितका तिरस्कार कराल, तितकी त्यांची मते वाढतील. २०१४ मध्ये आणि २०१९ मध्ये मतदारांनी विरोधकांना निवडणुकीत जागा दाखवून दिली,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
“बाबुराव कदम हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यांच्या मागे मुख्यमंत्री खंबीरपणे उभे आहेत. मागच्या सरकारचे मुख्यमंत्री असते तर निवडणुकीत किती खर्च करणार? आम्हाला किती देणार? असा प्रश्न बाबुराव कदमांना विचारला असता, मात्र आमच्याकडे हे चालत नाही. आता बाबुरावांना तिकिट मागण्यासाठी मुंबईला येण्याची गरज नाही. हिंगोली, यवतमाळ मोठ्या मताधिक्याने जिंकायचे आहे आणि बाबुराव कदम यांना थेट दिल्लीला खासदार म्हणून पाठवायचे,” असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. चांगल्या लोकांना पुढे आणण्याचे काम आम्ही शिवसेनेत करतोय, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
काहींना पाण्यात शिंदे दिसतात
“पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विचाराने राज्याचा सर्वांगीण विकास करत आहोत. शिवसेनेत आता ‘राजा का बेटा राजा नहीं बनेगा, काम करनेवाला राजा बनेगा!’. मी मुख्यमंत्री झाल्याचे अजूनही अनेकांना सहन होत नाही. ज्याप्रमाणे मुघलांना पाण्यात संताजी, धनाजींचे घोडे दिसायचे, तसेच इथं काहींना एकनाथ शिंदे दिसत आहेत. त्यांच्या विरोधामुळे आपण अधिक जोमाने काम करू लागलो,” असेही शिंदे म्हणाले.