मुंबई : प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या एलफिन्स्टन पुलाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र, या बैठकीत समाधानकारक तोडगा न निघाल्याने रहिवाशांचा एलफिन्स्टन पूल बंद करण्यास विरोध कायम असल्याचे मनसेचे स्थानिक नेते मंगेश कसालकर यांनी सांगितले. दरम्यान, एलफिन्स्टन पूल बंदीस रहिवाशांचा विरोध कायम असून रहिवाशांनी यासंदर्भात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. यावेळी शिवसेना आमदार अजय चौधरी, महेश सावंत, साईनाथ दुर्गे आदी लोकप्रतिनिधी सहभाग घेतला.
‘सह्याद्री’ अतिथीगृहावर सोमवारी झालेल्या बैठकीला राज्याच्या मुख्य सचिवांसह एमएमआरडीए, मुंबई महापालिका, एमएसआरडीसीचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी रहिवाशांचा विषय बैठकीत मांडून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर यांच्या काही सूचना आणि रहिवाशांच्या शिष्टमंडळाने केलेल्या सूचनेनुसार एलफिन्स्टन पुलाच्या कामात एकूण १९ इमारती बाधित होणार होत्या, पण सरकारने नवीन नियोजन केल्याने आता केवळ २ इमारती बाधित होणार आहेत.
त्यामुळे या सर्व १९ इमारतींचा पुनर्विकास कोणत्याही विकासकाची वाट न पाहता ‘३३ (९)’अंतर्गत एमएमआरडीएनेच करावा, अशी विनंती आशिष शेलार यांनी केली असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती मान्य केली. दरम्यान, ज्या दोन इमारतींमधील रहिवाशांची घरे बाधित होणार आहेत, त्यांना कुर्ला येथे घरे अथवा मोबदला देण्याऐवजी त्याच ठिकाणी पुनर्विकसित घरे देण्यात यावीत, अशी मागणी शेलार यांनी यावेळी केली.
सरकारने आमच्या सूचना मान्य केल्या असून भाजप आमदार कालिदास कोळबंकर यांच्यासह भाजपची भूमिका आहे की, गिरणगावातील मराठी माणसाला त्याच ठिकाणी घरे मिळायला हवीत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या गिरणगावातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे, अशी भावना व्यक्त करीत आशिष शेलार यांनी सरकारचे आभार मानले.
१९ इमारतींतील रहिवाशांना त्याच ठिकाणी घर
बाधित होणाऱ्या दोन इमारतींमधील रहिवाशांना कुर्ला येथे संक्रमण शिबीर म्हणून तात्पुरती घरे देण्यात येतील. तसेच अन्य १७ इमारतींचा पुनर्विकास करताना या दोन इमारतींतील रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे देण्याची रहिवाशांची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केली.