मुंबईतील शाळा सेफ झोन करण्याचा उपक्रम मुंबई महापालिकेने हाती घेतला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण अर्थात ‘राईट टू क्वॉलिटी एज्युकेशन’ हे ध्येय नजरेसमोर ठेवून त्यासाठी जाणीवपूर्वक चांगले बदल घडविण्यात आले. त्याही पुढे जाऊन आता सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याला मिळाले पाहिजे आणि तो त्यांचा अधिकार आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि निश्चिंतपणे शाळेत येता यावे, यासाठी ‘सुरक्षित शाळा प्रवेश’ या उपक्रमाचा शुभारंभ पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बुधवारी सह्याद्री अतिथीगृहात पार पडला. हे अभियान शालेय शिक्षण विभाग आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून राज्यात सर्वदूर पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षा आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योगमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित होते. “प्रत्येक शाळेच्या ५०० मीटर परिघामध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे वावरता आले पाहिजे. त्यासाठी चांगले पदपथ, पथदिवे, रस्ते, बसथांबे, रस्ता ओलांडण्याची सुविधा इत्यादी सर्व आवश्यक असतात. शाळेमध्ये येणाऱया प्रत्येक विद्यार्थ्याची डेंटल, मेंटल आणि डायबिटीज अर्थात दंत, मानसिक आणि मधुमेह या ३ आरोग्य पैलूंच्या दृष्टिकोनातून काळजी घेणे अत्यावश्यक आहे. दंतविकारामुळे बालकांमध्ये कुपोषणाची समस्या निर्माण होते. एवढेच नव्हे तर, मानसिक आरोग्य ठीक नसल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होतो. हे लक्षात घेता, या तिन्ही आरोग्य मुद्यांवर विद्यार्थ्यांची काळजीदेखील महानगरपालिकेच्या शाळांमधून घेतली जात आहे, त्यासाठीच सुरक्षित शाळा प्रवेश अभियान राबवित आहोत,” असे आदित्य यांनी सांगितले.
पालिका शाळांत प्रवेशासाठी गर्दी!
महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. हा आमूलाग्र बदल घडविण्यासाठी प्रचंड प्रयत्न करण्यात आले आहेत. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये २०११ मध्ये व्हर्च्युअल क्लासरुम सुरु केले. आज ६५० शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरुम आहेत. ५४ हजार विद्यार्थ्यांना टॅब दिले आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोर्डांच्या शाळा सुरु करण्यात येत आहेत. पर्यावरणाचे महत्त्व पटावे म्हणून निसर्ग शिक्षण देणारे वाघोबा क्लब, खगोलीय शिक्षण देणाऱया प्रयोगशाळा असे एक ना अनेक उपक्रम सुरु करुन विद्यार्थ्यांचा चौफेर विकास करण्यावर भर दिला जात आहे, अशी माहिती ठाकरे यांनी उपस्थितांना दिली.