मुंबईतील दादरच्या चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज (दि.०६) अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण हे बाबासाहेबांच्या संविधानामुळेच शक्य झाले" असे नमूद केले. यासोबतच, "आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था" झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी दरवर्षी दाखल होतात. डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या समुदायाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबोधित केले.
भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राच्या प्रगतीचा पाया घातला. बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आज भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहे," असे त्यांनी सांगितले.
भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी बाबासाहेबांच्या संविधानामुळेच शक्य
ते पुढे म्हणाले, "राष्ट्रीय विद्युत ग्रीडची संकल्पना भारताने बाबासाहेबांमुळे वेळेत स्वीकारली. त्यातून देश ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहे. भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी आणि सामान्य जनतेच्या हक्कांचे रक्षण हे बाबासाहेबांच्या संविधानामुळेच शक्य झाले."
जगातील सर्वोत्तम संविधान भारताकडे
"समाजात विषमता दूर करून समता, बंधुता आणि सर्वांना समान संधी देणारे संविधान बाबासाहेबांनी देशाला दिले. ज्ञानाच्या बळावर त्यांनी समाजात समतेची जाणीव दृढ केली. जगातील सर्वोत्तम संविधान भारताकडे असून प्रत्येक प्रश्नाचे उत्तर याच संविधानात मिळते. आगामी काळात चैत्यभूमी परिसरातील स्मारक विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे", असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. इतक्या मोठ्या राष्ट्रात एकता, न्याय व समतेची संघटित भावना दृढ करण्यासाठी संविधान निर्माण करणे हे अत्यंत मोठे व ऐतिहासिक कार्य होते. देशाच्या सामाजिक विविधतेत सर्वांना एकत्र आणणारे आणि समान अधिकार प्रदान करणारे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्राला दिले.राज्यपाल आचार्य देवव्रत
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही बाबासाहेबांनी जगाला दिलेली त्रिसूत्री आजही समाज परिवर्तनासाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांनी नमूद केले. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार मूल्यांवर आधारित संविधान तयार करून तळागाळातील वंचित व दुर्बल घटकांना सशक्त करण्याचे ऐतिहासिक कार्य डॉ. आंबेडकरांनी केले.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
या कार्यक्रमात सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण केले आणि डॉ. बाबासाहेबांना अभिवादन केले. यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सर्व भिक्खूंना चिवरदान दिले. त्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनाला मान्यवरांनी भेट दिली. चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य त्रिभाषा धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र जाधव यांनी सर्व मान्यवरांना संविधानाची प्रत दिली.