सध्या सर्वत्र दांडियाचा फिवर असल्याचे बघायला मिळत आहे. नव्या सरकारने दिलेली सूट आणि गेल्या दोन वर्षाची राहिलेली कसर सगळी एकदाच बाहेर पडताना दिसत आहे. सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना विरारमध्ये मात्र काल एक अतिशय दुःखद घटना घडली. गरबा खेळत असताना मुलाला हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. मुलाचा मृतदेह पाहून वडिलांनाही इतका मानसिक धक्का बसला की त्यांचाही जागीच मृत्यू झाला. एकाच घरातील दोन कर्ते पुरुष गमावल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
विरार पश्चिम येथील ग्लोबल सिटी येथील अग्रवाल कॉम्प्लेक्समधील एव्हरशाईन अव्हेन्यू येथे ही धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली. मनीषकुमार नरपथ जैन (वय ३५) हे सोसायटीच्या आवारात गरबा खेळत होते. गरबा खेळताना मनीष कुमारला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना तातडीने रिक्षात बसवून विरार येथील संजीवनी रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी मनीषकुमारचे वडील नरपथ हरिश्चंद्र जैन (६५) हे रिक्षात बसले होते. रिक्षा संजीवनी हॉस्पिटलच्या वैद्यकीय केंद्राजवळ येताच मनीषकुमार रिक्षातून खाली पडला. रिक्षात बसलेल्या मुलाला असे पडलेले पाहून नरपथ यांना देखील चक्कर आली आणि तेही खाली पडले. त्यामुळे दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी या दोन्ही बापलेकांची तपासणी करून दोघांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले. दरम्यान, याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.