मुंबई : परवाना नसलेल्या कंपन्यांकडून सरकारी रुग्णालयांना सर्जिकल सामग्री व औषधांचा बेकायदेशीर पुरवठा होत असल्याचे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) छाप्यात आढळले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने मुंबई, भिवंडी आणि पालघर येथे छापे टाकले. यात मुंबई मनपाच्या रुग्णालयांसह शासकीय रुग्णालयांना २.१७ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सर्जिकल ग्लोव्हज (हातमोजे), पट्ट्या, शोषक कापूस आणि औषधांचा कथित बेकायदेशीर पुरवठा केल्याचे उघडकीस आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
‘एफडीए’ अधिकाऱ्यांच्या मते, या छाप्यांमुळे ‘औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४०’ आणि ‘वैद्यकीय उपकरणे नियम, २०१७’ अंतर्गत वैध परवाने आणि अनिवार्य गुणवत्ता मानकांशिवाय वैद्यकीय उपकरणांची साठवणूक, पॅकेजिंग आणि पुरवठा करण्यातील मोठ्या प्रमाणावरील नियमांचे उल्लंघन समोर आले आहे. शासकीय रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांना निर्जंतुक नसलेले हातमोजे हे निर्जंतुक सर्जिकल हातमोजे असल्याचे खोटे लेबल लावून पुरवले गेल्याचा संशयही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
साकीनाका येथील ‘मेसर्स साची मेडिक’ या फर्मकडून ७४.८५ लाख रुपयांचे सर्जिकल हातमोजे जप्त केले. ही फर्म वैध परवान्याशिवाय आयात हातमोज्यांची साठवणूक आणि विक्री करत असल्याचे आढळले. कंपनीने मलेशियामधून सर्जिकल हातमोजे आयात केले होते आणि वितरणापूर्वी पॅकेजिंग आणि लेबलिंगसाठी ते भिवंडी आणि वाडामधील युनिट्सना पुरवले होते,’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
तपासणीच्यावेळी मिळालेल्या कागदपत्रांवरून हे साहित्य बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना पुरवले गेल्याचे उघड झाले आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या फर्मशी संबंधित भिवंडीतील एका उत्पादन युनिटमध्ये केलेल्या तपासणीत, ‘एफडीए’च्या पथकांना 'वैद्यकीय उपकरणे नियम, २०१७’ चे मोठे उल्लंघन झाल्याचे आढळले. यात गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली, मानक संचालन प्रक्रिया आणि प्लांट मास्टर फाइलचा अभाव समाविष्ट होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ९.८८ लाख रुपयांचे सर्जिकल हातमोजे जप्त करण्यात आले आणि या सुविधेतील उत्पादन थांबवण्याचे आदेश देण्यात आले.
पालघरमधील वाडा येथील 'मेसर्स मीडिआर्थ लाईफकेअर प्रा. लि.’ वर टाकलेल्या दुसऱ्या एका मोठ्या छाप्यात, एफडीए अधिकाऱ्यांनी आरोप केला की, कंपनीने निर्जंतुकीकरण उपकरणे बंद असतानाही, निर्जंतुक नसलेले हातमोजे खरेदी केले आणि ते शासकीय रुग्णालयांना निर्जंतुक उत्पादने म्हणून पुरवले. कंपनीच्या मालकाने चौकशीत लेखी कबुली दिली आहे,’ असा दावा एफडीएने केला.
एफडीएला निर्जंतुक नसलेले पट्टीचे कापड, गुंडाळलेल्या पट्ट्या आणि शोषक कापूस आढळला. ज्यावर ‘महाराष्ट्र शासन पुरवठा – विक्रीसाठी नाही’ असे लेबल होते. १.२६ कोटी रुपये किमतीच्या या साठ्याच्या विक्री आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. वैध घाऊक औषध परवान्याशिवाय साठवणूक केल्याच्या आरोपावरून आवारातून ६.१७ लाख रुपयांची ॲलोपॅथिक औषधे जप्त केली.
औषधे अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करा
हे प्रकरण राज्य आरोग्य विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेला कळवले जात आहे. आम्ही सर्व रुग्णालये, डॉक्टर आणि वैद्यकीय महाविद्यालयांना आवाहन करतो की त्यांनी वैद्यकीय उपकरणे आणि औषधे केवळ अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावीत, असे एफडीए अधिकाऱ्यांनी सांगितले.