मुंबई : मुंबईत आतापर्यंत मेट्रोच्या तीन मार्गिका सुरू झाल्या आहेत. पण, सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ‘मेट्रो-३’ आहे. ही मार्गिका सुरू झाल्यावर लोकलवरील मोठा ताण कमी होणार आहे. सीप्झ ते कुलाब्यापर्यंत धावणाऱ्या या मार्गिकेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गिेकेचा पहिला टप्पा डिसेंबर-जानेवारीपासून सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
‘मेट्रो-३’ हिला ‘ॲॅक्वालाईन’ म्हणून ओळखली जाते. कफ परेड, बीकेसी, आरे कॉलनी ते सीप्झदरम्यान ती चालवली जाणार आहे. ही मार्गिका पूर्णपणे भुयारी आहे. विशेष म्हणजे मुंबईकर ज्या भागातून सर्वाधिक प्रवास करतात तेथून ही मेट्रो जाईल. यामुळे अन्य वाहतुकीवर ताण कमी होऊ शकेल. ही मार्गिका केवळ उत्तर दक्षिण उपनगरीय रेल्वेला जोडणारी असून पूर्व-पश्चिमेला जोडणारी आहे.
एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे म्हणाल्या की, ६ व्यापारी संकुल व सीबीडी विभाग हे या मेट्रोने जोडले जाणार आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात कर्मचारी जात असतात. ही मार्गिका मुंबईची दुसरी जीवनवाहिनी बनेल, असे त्या म्हणाल्या.
१७ लाख प्रवासी प्रवास करतील
ही मार्गिका पूर्ण झाल्यानंतर सीप्झ-बीकेसी ते कफ परेडदरम्यान रोज १७ लाख प्रवासी प्रवास करतील. पहिल्या टप्प्यात डिसेंबर ते जानेवारीत सीप्झ, आरे कॉलनी, एमआयडीसी मरोळ नाका, सहार रोड, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमानतळ, सांताक्रुझ, विद्यानगरी व बीकेसी हे जोडले जातील. या मार्गिकेचा दुसरा टप्पा जुलै २०२४ पासून सुरू होईल. या मार्गावर १७ रेल्वे स्टेशन्स आहेत. अत्यंत दाटीवाटीच्या मार्गावरून ही रेल्वे धावणार आहे.
या आहेत सुविधा
या मेट्रो मार्गिकेवर २४ तास टेहळणी, एस्कलेटर, एसी, वायफाय, मोबाईल कनेक्टिव्हीटी आहेत. तसेच या ट्रेन ड्रायव्हरलेस तंत्रज्ञानावर चालतील. वेगवान, सुरक्षित, खात्रीशीर व आरामदायी प्रवास प्रवाशांना करता येऊ शकेल. न जोडलेल्यांना जोडणे असे मेट्रो प्रकल्पाचे ब्रीदवाक्य आहे.
प्रवाशांसाठी सामायिक मोबिलिटी कार्ड तयार केले जाणार आहे. त्याचा फायदा रेल्वे प्रवास, मोनो रेल्वे, बेस्ट बस, मेट्रो प्रवाशांना होऊ शकेल. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना वेळ घालवावा लागणार नाही.
मुंबईतील ८५ टक्के जण सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करतात. हे काम मुंबईची उपनगरीय रेल्वे सेवा करते. आता उपनगरीय रेल्वेत मोठे बदल होणे गरजेचे आहे. कारण बीकेसी हे मोठे व्यापार केंद्र विकसित झाले आहे. ते मुंबईच्या लोकल नेटवर्कशी जोडलेले नाही, तर गर्दीने भरून वाहणाऱ्या लोकल गाड्या हा चांगला पर्याय ठरू शकत नाही. बेस्ट बसेस ३५ ते ४० टक्के लोड खेचतात. तसेच मुंबईकर कार, दुचाकींचा वापरही करतात. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी होते.
‘मेट्रो-३’चे फायदे
मेट्रो-३ मार्गिका ही ३३.५ किमीची आहे. ही मार्गिका सुरू झाल्यावर मुंबईच्या रस्त्यावरील ३५ टक्के वाहतूक कमी होईल. ६.५ लाख वाहन फेऱ्या कमी होतील, तर ३.५ लाख लिटर इंधन वाचेल.