मुंबई : ऐन गणेशोत्सवात शहराच्या विविध भागात रविवारी झालेल्या भिन्न दुर्घटनांमध्ये ५ जण ठार झाले असून ९ जण जखमी झाले आहेत. काळाचौकीत पाणपोईतून वीज प्रवाह शिरल्याने दोघांचा मृत्यू झाला तर चौघे जण जखमी झाले. कोस्टल रोडच्या पुलावरून अलिशान कार कोसळून तिघे जण ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. मुलुंडला बेस्ट बस व खासगी बसची समोरासमोर टक्कर झाली. यात बेस्ट चालक जखमी झाला.
विजेच्या धक्क्याने ८ वर्षांच्या मुलीसह महिलेचा मृत्यू
मुंबई : काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरील महागणपती उत्सव मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या तात्पुरत्या पिण्याच्या पाण्याच्या स्टॉलला विजेचा धक्का लागल्याने ८ वर्षीय मुलीसह महिलेचा मृत्यू झाला आहे. तर १२ वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू झाला आहे.
काळाचौकी येथील महागणपती उत्सव मंडळाच्या गणपतीसाठी मोठी गर्दी होती. भक्तांच्या सोयीसाठी मंडळाच्या प्रवेशद्वारावर पाणपोई आहे. याच पाणपोईतून विद्युत प्रवाह वाहत असल्याने सहा जणांना धक्का लागला. जखमींना मसिना व ग्लोबल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र राघिनी घनश्याम यादव (८) व सुजाता (३३) यांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाल्याचे दोन्ही रुग्णालय प्रशासनाने सांगितले.
अन्य जखमींपैकी किरण अकबर नाईक (१९), तन्वी नरेश हांडे (१९) आणि साहिल संदीप तारे (१९) यांची प्रकृती स्थिर असून रुही सिंग (१२) हिची प्रकृती गंभीर आहे. तिला ग्लोबल रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
रविवारी पहाटे २.४२ वाजण्याच्या सुमारास मंडळाच्या प्रवेशद्वाराजवळील तात्पुरत्या पाणपोईमध्ये विद्युत प्रवाह असल्याचे निदर्शनास आले. ही माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ वीजपुरवठा बंद करून परिसर बंद केला. बेस्ट प्रशासनानेही घटनास्थळी पाहणी केली. दिग्विजय मिल चाळ, दत्ताराम लाड मार्ग येथील डीएलएम-१४ क्रमांकाच्या खांबाजवळ गणेशोत्सव रोषणाई व शीतपेय स्टॉलसाठी बसविण्यात आलेल्या तात्पुरत्या मीटरची तपासणी करण्यात आली. संबंधित मीटरचे वायरिंग आणि एमसीबी स्थानिक इलेक्ट्रिशियनने आधीच खंडित केल्याचे आढळून आले. खबरदारीचा उपाय म्हणून त्या ठिकाणचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे. या घटनेत एकूण सहा जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. विद्युतप्रवाह नेमका कशामुळे आला, तात्पुरत्या वीजजोडणीत काही त्रुटी होत्या का, याचा तपास काळाचौकी पोलीस आणि बेस्ट उपक्रमाकडून सुरु आहे.
कृत्रिम तलावात एकाचा मृत्यू
जोगेश्वरी (पूर्व) येथील श्यामनगर परिसरातील कृत्रिम विसर्जन तलावात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास विजेचा शॉक लागून कंत्राटदाराच्या रोहित भीमू राठोड (१९) या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गणेश विसर्जन व्यवस्थेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेच्या के/उत्तर विभागाच्या माहितीनुसार, जोगेश्वरी (पूर्व) येथील श्यामनगर तलाव परिसरात गणेशमूर्ती विसर्जनासाठी पाच कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. यापैकी चार तलाव मध्यरात्रीनंतर बंद केले होते. बंद असलेल्या तलावात कंत्राटदाराचा कर्मचारी रोहित भीमू राठोड ( १९) हा मूर्ती विसर्जनासाठी उतरला असता त्याला अचानक विजेचा धक्का बसला. त्याला तातडीने उपचारासाठी ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
कोस्टल रोडवर तीन ठार
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास वेगवान होण्यासाठी बांधलेल्या कोस्टल रोडवर रविवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली. भरधाव चारचाकी अनियंत्रित झाल्याने कोस्टल रोड पुलावरून ५० फूट खाली पडली. या दुर्घटनेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चौथ्या तरुणाची प्रकृती गंभीर आहे. या अपघातातील मृतांचे वय १७ ते २१ वयोगटातील आहे.
शानय गज्जल (२१), धैर्य सेठ (१७) आणि आदित्य जकसनिया (१९) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. आदित्य ओसवाल हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही कार दीव दमणच्या सिल्वासा येथील असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या शानय गज्जल याच्या नातेवाईकांची ही कार होती. त्यात बसलेले सर्व तरुण अहमदाबाद येथील असून शिक्षणासाठी मुंबईत आले होते. हे सर्वजण रविवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास नरिमन पॉईंट ते हाजीअलीला कोस्टल रोडवरुन जात होते. यावेळी कार भरधाव होती. कोस्टल रोडवरील लोटस जेटीजवळ आल्यावर कार अनियंत्रित झाली आणि उड्डाणपुलाच्या रेलिंगला जोरात धडकली. यावेळी कारचा वेग इतका होता की, रेलिंगला लागून असलेला विजेचा खांब तोडून ही कार ५० फूट खाली कोसळली. या कारचा चेंदामेंदा झाला आहे.
अपघाताच्या वेळी गाडीतील तरुणांनी मद्यपान केले होते का, याची पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे. ताडदेव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनास्थळावरुन फॉरेन्सिक पथकाने पुरावेही गोळा केले आहेत.
खासगी बसशी टक्कर, बेस्ट बसला आग
मुंबई : मुलुंड येथील रेली वुल्फ परिसरात मेट्रोचे काम सुरु असल्याने वाहतुकीत बदल केले आहेत. हे बदल केल्याने बेस्ट बस चालक व खासगी ट्रॅव्हल्स बस चालकाचा गोंधळ उडाला. त्यामुळे बेस्ट बस व ट्रॅव्हल्स बस समोरासमोर धडकल्याची घटना रविवारी पहाटे ५.५० च्या सुमारास घडली. या घटनेत बेस्ट बस चालक संदीप नामदेव करांडे यांच्या पोटाला स्टेअरिंग आदळले आणि ते जखमी झाले. दरम्यान, बस वाहकाने प्रसंगावधान राखत अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने आग विझविल्याने मोठी दुर्घटना टळली.
मजास आगाराची मार्ग क्रमांक ४९६/३१ वरील कंत्राटी बस (एमएच-०१-डीआर-५०२४) रविवारी पहाटे सुमारे ५.५० वाजता सीप्झ येथून तीन हात नाका दिशेने जात होती. मुलुंड येथील रेली वुल्फ परिसरात मेट्रोच्या कामामुळे एकमार्गी वाहतूक व्यवस्था लागू केली होती. याच ठिकाणी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसने (एमएच-०९-एफएल-१०४४) बेस्ट बसला समोरून धडक दिली. या अपघातात बेस्ट बस चालक संदीप नामदेव करांडे यांच्या पोटावर स्टिअरिंग जोरदार आदळले. तसेच त्यांच्या उजव्या पायाला दुखापत होऊन रक्तस्राव झाला. धडकेच्या तीव्रतेमुळे बसच्या बॉनेटला आग लागली. मात्र, बस वाहकाने तत्काळ अग्निशामक यंत्राचा वापर करून आग आटोक्यात आणली.
दरम्यान, प्रवाशांनी अग्निशमन दलाला माहिती दिली पण अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच आग विझविण्यात आली होती. जखमी चालकाला तातडीने अगरवाल रुग्णालयात दाखल केले. उपचारांनंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाने सांगितले.
या घटनेनंतर वाहतूक अधिकारी खांडे, वाहतूक अधिकारी शिरसाठ, बस निरीक्षकांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ परिसरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. बेस्ट उपक्रम व स्थानिक पोलीस पुढील तपास करीत आहेत.
कार पेटल्याने डॉक्टरचा होरपळून मृत्यू
हैदराबाद : तेलंगणातील सूर्यापेट जिल्ह्यात रविवारी रस्त्याच्या दुभाजकाला कार धडकल्यानंतर कारने पेट घेतला. या आगीत कार चालक डॉक्टरचा होरपळून मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हैदराबाद-खम्मम महामार्गावरील पिल्ललामरी उड्डाणपुलाजवळ सकाळी सुमारे ७.१५ वाजता हा अपघात झाला, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दुभाजकाला धडकल्यानंतर कारने पेट घेतला आणि काही वेळातच ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझवली; मात्र तोपर्यंत कार खाक झाली होती. त्यानंतर चालकाच्या आसनावर होरपळलेला मृतदेह आढळून आला. जवळच्या टोल नाक्यावरून मिळालेली माहिती आणि वाहनाच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे मृताची ओळख पटली.