फोर्टमधील 'पूर्णिमा' हॉटेलची हायकोर्टात याचिका; FDA च्या कारवाईला आव्हान 
मुंबई

फोर्टमधील 'पूर्णिमा' हॉटेलची हायकोर्टात याचिका; FDA च्या कारवाईला आव्हान

फोर्ट परिसरातील वकील आणि नोकरदारांचे आवडते दाक्षिणात्य उपाहारगृह ‘पूर्णिमा’च्या मालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या शुक्रवारी अचानक तपासणी करून या हॉटेलला ठोकलेले टाळे आणि निलंबित केलेला परवाना याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : फोर्ट परिसरातील वकील आणि नोकरदारांचे आवडते दाक्षिणात्य उपाहारगृह ‘पूर्णिमा’च्या मालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या शुक्रवारी अचानक तपासणी करून या हॉटेलला ठोकलेले टाळे आणि निलंबित केलेला परवाना याविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. एफडीएचे निष्कर्ष चुकीचे आणि खोटे असल्याचा दावा मालकांनी केला आहे.

अन्न आणि औषध नियंत्रण कायद्यांतर्गत त्रुटी सुधारण्यासाठी १४ दिवसांची पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे. असे असताना एफडीएने थेट ‘एफएसएसएआय’ परवाना निलंबित केला, असा दावा पूर्णिमा उपहारगृहाच्या मालकांनी याचिकेत केला आहे.

एफडीएने शेवग्याच्या शेंगा आणि केळ्यांवर बुरशी असल्याचा आरोप केला आणि कारवाई केली. मात्र, केवळ लॅब टेस्टद्वारेच बुरशी सिद्ध होऊ शकते. हॉटेलने अन्नपदार्थांचे नमुने घेण्याची विनंती केली असता, अधिकाऱ्यांनी नकार दिला. केळीचे साल नैसर्गिकरित्या काळे पडते, ती बुरशी नाही, असा युक्तिवाद हॉटेलने केला आहे.

दुपारच्या गर्दीनंतर हॉटेलमध्ये साफसफाई आणि लादी पुसण्याचे काम सुरू होते. फरशी ओली असणे आणि उपकरणांवर अन्नकण दिसणे स्वाभाविक होते, जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. तसेच हॉटेलच्या भिंतींवर पूर्ण टाईल्स आणि छतावर ॲॅल्युमिनियमचे क्लॅडिंग असताना एफडीएच्या नोटीसमध्ये भिंतींचे प्लास्टर आणि रंग निघत असल्याचा खोटा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच हॉटेलमध्ये कोणतीही झुरळे किंवा उंदीर आढळलेले नाहीत, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

वंदे मातरमचा अपमान आता फौजदारी गुन्हा; विधेयक राज्यसभेत मंजूर

जन्ममृत्यू नोंदींबाबत नवे सुधारणा ‌विधेयक

मुंबईत पावसाचा जोर वाढणार! ठाणे, रायगड, पालघरमध्ये कोसळधारेचा इशारा; पुण्यात जुलैतील विक्रम मोडणार

दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; मेट्रो स्थानकांमध्ये शिरलं पाणी, रस्तेही जलमय

शाळांजवळ ५० मीटरच्या परिसरात 'जंक फूड' विक्री बंद; कठोर कारवाईचा FDA चा इशारा