मुंबई

बोगस डॉक्टरसह चौघांना अटक ;अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात उघड

प्रतिनिधी

मुंबई : युनानी डॉक्टर असल्याची बतावणी करुन सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या एका राजस्थानी टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एका डॉक्टरसह मोहम्मद शेरु शेख मकसूद खान ऊर्फ डॉ. आर पटेल, मोहम्मद नफीस मोहम्मद शरीफ, मोहम्मद आसिफ मोहम्मद निसार, मोहम्मद आशिफ मोहम्मद शरीफ यांना अटक केली.

त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यांत वापरलेले वैद्यकीय साहित्यासह नऊ मोबाईल फोन, सिमकार्ड, व्हॅगनार कार असा सुमारे चौदा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने डॉक्टर असल्याची बतावणी करुन आतापर्यंत अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. यातील वयोवृद्ध तक्रारदार वडाळा परिसरात राहत असून ते व्यावसायिक आहेत. २६ ऑक्टोबरला ते नरिमन पॉंईटला गेले होते. यावेळी त्यांची ओळख राकेश अग्रवाल आणि डॉ. आर पटेल या दोघांशी झाली होती. त्यांनी ते दोघेही युनानी डॉक्टर असल्याची बतावणी केली होती. त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी तसेच अधिकृत वैद्यकीय परवाना नव्हता. तरीही फसवणुकीच्या उद्देशाने त्यांनी त्यांना ते युनानी क्षेत्रातील नामांकित डॉक्टर असल्याचे सांगून त्यांचा अहमदाबादला युनानी रुग्णालय असल्याचे सांगितले होते. त्यांचा विश्‍वास संपादन करुन त्यांनी त्यांना ट्रेमर आजार असल्याचे जाणून घेतले आणि त्यावर जालिम उपचार करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्या घरी जाऊन उपचार सुरु केले.

पित्तामुळे नस दबल्याने त्यांचे दोन्ही हात थरथरत असल्याचे सांगून थामूरमाथूर औषधोपचार करुन त्यांना बोगस औषधे दिली होती. या उपचाराच्या नावाने त्यांनी त्यांच्याकडून साडेचौदा लाख रुपये घेतले होते. मात्र त्यांच्या उपचाराने त्यांना काहीच फरक पडला नव्हता. त्यामुळे त्यांनी त्यांना फोन केला असता दोघांचेही फोन बंद येत होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी मरिनड्राईव्ह पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा नोंद होताच पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. फसवणूक करणारी ही राजस्थानी टोळी असल्याचे उघडकीस आले होते. ही टोळी मनोर, पालघर, भिवंडी, ठाणे, मालेगाव नाशिक येथे मोकळ्या मैदानात तंबू लावून सर्वसमान्यांना युनानी डॉक्टर असल्याचे सांगून उपचाराच्या नावाने त्यांची फसवणूक करत होती. पोलिसांनी मालेगावातून बोगस डॉक्टरसह त्याच्या इतर तीन सहकाऱ्यांना अटक केली. याच गुन्ह्यांत ते चौघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांनी आणखी सहाजणांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यांच्या अटकेने अशाच इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस