मुंबई

विदेशात उच्च शिक्षणासाठी पैसे घेऊन डॉक्टर तरुणीची फसवणूक

प्रतिनिधी

मुंबई - विदेशात उच्च शिक्षणासाठी पैसे घेऊन एका डॉक्टर तरुणीची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध पंतनगर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. वनिशा ललितकुमार कोठारी, हिमांशू कृष्णा खांडेलवाल, विनित योगेश खांडेलवाल आणि हर्षल प्रभूदास खोब्रागडे अशी या चौघांची नावे असून त्यांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. ३९ वर्षीय तरुणी ही दातांची डॉक्टर असून ती पवईतील एका रुग्णालयात कामाला आहे. तिची मैत्रीण विदेशात उच्च शिक्षण घेत असून तिलाही विदेशात उच्च शिक्षणासाठी जायचे होते. यावेळी तिच्या मैत्रिणीने तिला इंदू डेस्टिनेशन कन्सल्टंसी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची माहिती देताना तिला संबंधित आरोपीचे मोबाईल क्रमांक दिले होते. त्यामुळे तिने वनिशा या महिलेसह इतर तीन आरोपींशी संपर्क साधून तिला यूएसला उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी मदत करण्याची विनंती केली होती. ग्रुप कॉलवर संपर्क साधल्यानंतर त्यांनी तिला उच्च शिक्षणाची सर्व प्रक्रिया सांगून तिच्याकडून सात ते दहा लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले होते. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून तिने त्यांना टप्प्याटप्प्याने सुमारे सात लाख रुपये दिले होते. मात्र ही रक्कम दिल्याची त्यांनी तिला कुठलीही पावती दिली नव्हती. मात्र विदेशात जाण्यासाठी काही अडचणी येऊ नयेत म्हणून तिने त्यांच्याकडे पावतीची मागणी केली नाही. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी तिला विदेशातील कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला नाही. विविध कारणं सांगून ते तिला टाळत होते. या चौघांकडून कामाची शाश्‍वती नसल्याने तिने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र त्यांनी तिला पैसे परत केले नाहीत. त्यांनी दिलेला धनादेश बँकेत न वटता परत आला होता. त्यामुळे तिने त्यांच्याविरुद्ध पंतनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस