मुंबई : लाडक्या गणरायाच्या आगमनाची प्रतीक्षा संपत आली असून बुधवारी घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये बाप्पाच्या मूर्तीची पूजाअर्चा करून प्रतिष्ठापना केली जाईल. घरगुती असो वा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. लालबाग, दादरच्या पारंपरिक पूजा व सुगंधी वस्तूंच्या बाजारपेठांमध्ये यंदा गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी गजबज वाढली आहे. माऊली, गोल्डन राज, पारसमणी, रुद्राक्ष, साई चमत्कार या नवनवीन अगरबत्त्यांनी बाजार दरवळले आहेत.
दादर मार्केट हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी मुंबईबाहेरील ग्राहकही मोठ्या प्रमाणात येत असतात. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, दिवाळी या सणासुदीत तर दारदमध्ये पाय ठेवायला जागा नसते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत गणेशोत्सवाची धूम पाहावयास मिळत आहे. सुगंधी अगरबत्ती, धुप, कंठी माळ, देवाचे वस्त्र, कापूस, प्लास्टिक फुलांचे हार आदी पूजेचे साहित्य खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. मुंबईसह गावाकडचे लोकही बाप्पाच्या आगमनापूर्वी खरेदीसाठी दादरमध्ये येत असून काही भक्तांनी तर गर्दी टाळण्यासाठी आधीच खरेदी केल्याचे दादरमधील अगरबत्ती विक्रेत्यांनी सांगितले.
‘आमच्याकडे सहारा, माऊली, चंदन वूड, कस्तुरी, सुनहरी, नीलमणी अशा विविध सुगंधी अगरबत्ती उपलब्ध आहेत. साधे धुप २५० रुपये पाव किलो, महागडे धुप ४०० रुपये पाव किलो असल्याचे,’ कीर्तीकर मार्केटमधील दीपक अगरबत्ती सेंटरचे मालक राहुल नाईक यांनी दैनिक 'नवशक्ति'शी बोलताना सांगितले.
फुलांच्या मागणीत वाढ
गणेशोत्सवात फुलांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. फुलांच्या दरात वाढ झाली असली तरी गणेशोत्सवात सुगंधित फुले, मोगरा, झेंडू, गोंडा, शेवंती, गुलछडी, चाफा आणि बाप्पाचे आवडते फूल जास्वंदी आवर्जून खरेदी केली जाते.