मुंबई : संपूर्ण स्वच्छ मुंबई अभियानाअंतर्गत आता झोपडपट्टीत कचरा मुक्तीचे उद्दीष्ट मुंबई महापालिकेने ठेवले आहे. कचरामुक्त झोपडपट्टी यासाठी मुंबई महापालिका आता स्वतंत्र धोरण राबवणार आहे. स्वतंत्र धोरणाअंतर्गत प्रत्येक झोपडपट्टीसाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार असून झोपडपट्टीतील कचरा, गटारे, नाल्यात अस्वच्छता निदर्शनास आल्यास संबंधित कंत्राटदार जबाबदार असणार आहे.
दीड कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात ६० टक्के मुंबईकर झोपडपट्टीत वास्तव्य करतात. आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असून झोपडपट्टीच्या स्वच्छतेकडे काहीसे दुर्लक्ष झाले. त्यामुळे झोपडपट्टी कचरामुक्तीसाठी स्वतंत्र धोरण राबवण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
पालिकेच्या प्रस्तावित धोरणानुसार झोपडपट्टीतील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि डम्पिंग ग्राऊंडपर्यंत कचरा पोहोचवण्याची जबाबदारी कंत्राटदारांवर सोपवण्यात येणार आहे. तसेच झोपडपट्टी वस्तीमधील गल्ल्यांची सफाई, छोट्या गटारांची सफाईसाठीदेखील स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात येईल. ही गटारे वर्षभर अनेक वेळा स्वच्छ करावी लागणार आहे. झोपडपट्टीनजीक असणाऱ्या छोट्या नाल्यांची स्वच्छता राखणे, पावसाळ्याआधी, पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर स्वच्छता राखण्याची जबाबदारी स्वतंत्र कंत्राटदारावर असणार आहे.
स्वतंत्र धोरणांतर्गत कंत्राटदारांची जबाबदारी!
झोपडपट्टी भागातील कचरा संकलन, त्याचे वर्गीकरण आणि डम्पिंग ग्राऊंडपर्यंत कचरा पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात येईल. झोपडपट्टी वस्तीमधील गल्ल्यांची सफाई, छोट्या गटारांची सफाईसाठीदेखील स्वतंत्र कंत्राटदार नेमण्यात येईल. झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतागृहांच्या सफाईची जबाबदारी स्वतंत्र कंत्राटदारावर असेल. दिवसातून दोन ते तीन वेळा या स्वच्छतागृहांची स्वच्छता कारवी लागेल.