`नीलकमल`च्या डेकवर मी उभा होता. आपल्या दिशेने येणारी `नौदला`ची स्पीड बोट काही तरी अघटित घडविणार, हे मनाने हेरले होते. आणि नेमके तेच झाले….गेट वेनजीकच्या दुर्घटनेतून बचावलेला ४५ वर्षीय गणेश सांगत होता. जे अपरिहार्य आहे ते होईल आणि तसेच झाले, गणेशला भावना आवरत नव्हत्या. तो म्हणाला, ती बोट अरबी समुद्रात वर्तुळाकार फिरत होती. तर आमची फेरी एलिफंटा बेटाकडे निघाली होती. मी दुपारी ३.३० वाजता फेरीमध्ये चढलो होतो.फेरीच्या डेकवर उभा असलेल्या गणेशने सांगितले की, माझ्या मनात थोडा विचार आला की, नौदलाच्या जहाजाने आमच्या बोटीला धडक दिली तर…आणि काही सेकंदातच तसे घडले.हैदराबादचा रहिवासी असलेला गणेश सांगतो, मी फेरीत चढलो आणि डेकवर गेलो. मी अरबी समुद्र आणि मुंबईच्या आकाशरेषेचे निरीक्षण करत होतो. तेव्हा फेरी बोट किनाऱ्यापासून ८ ते १० किमी अंतरावर असावी. मी पाहिले की, स्पीड बोट आमच्या फेरीच्या नजीक वर्तुळ करत पूर्ण गतीने येत होती.धक्क्यातून जखमी झालेल्या नौदलाच्या कर्मचारीचाही मृत्यू झाला, असे त्यांनी सांगितले. बोट फेरीला धडकली. पाणी बोटीत येऊ लागले. कॅप्टनने प्रवाशांना लाइफ जॅकेट घालण्यास सांगितले, कारण जहाज बुडायला लागले होते… मी लाइफ जॅकेट घेतले आणि वर गेलो आणि तेथून समुद्रात उडी मारली १५ मिनिटे पोहल्यानंतर मला दुसऱ्या बोटीने वाचवले आणि इतरांसह गेटवे ऑफ इंडिया जवळ आणले. नौदल, कोस्ट गार्ड आणि मरीन पोलिसांच्या बचाव पथकांनी धडक घालल्याच्या अर्ध्या तासात फेरीच्या नजीक पोहोचले, असे त्यांनी सांगितले."मी १० प्रवाशांपैकी पहिल्या गटात वाचवला गेलो," असे गणेश म्हणाले.बंगळुरुचे विनायक मठम यांनी सांगितले की, ते आपल्या दोन सहकाऱ्यांसह फेरी बोटवर आले होते. मठम सांगतात, एक छोटी बोट समुद्रात फिरताना आम्हाला दिसत होती. ती नौदलाची असल्याचे अपघातानंतरच कळले. ही बोट आमच्या फेरीबोटीच्या आजूबाजूला वर्तुळाकार रचनेत फिरत होती. आमच्या फेरीबोटीत चढलेल्या प्रवाशांकडे पुरेसे लाइफ जॅकेट नव्हते. आमच्या बोटीमधील प्रवासी चढल्यानंतर खरे तर त्यांना लाइफ जॅकेट देऊनच प्रवेश द्यायला हवा होता. मात्र तसे झालेले दिसत नव्हते.
इतिहासातील दुर्घटना
भर समुद्रातील प्रवास पोटात गोळा आणणारा. अथांग सागरात असंख्य प्रवाशांची संगत असली तरी लाट आणि वाऱ्यामुळे बसणारा प्रत्येक हेलकावा असुरक्षित करतो. पर्यटनस्थळी असलेल्या बोटीचा प्रवास हा अधिकतर वेळा प्रवासी संख्या, लाईफ जॅकेट आदींबाबत नियमांची पूर्तता करत नसल्याचेही स्पष्ट होते. अशातच महिन्यात एखाद-दुसरी घटना घडते. आणि जीवित हानी होते. दुर्घटनेसाठी समिती, चौकशी, कारवाई होते. मात्र नियमांची पुन्हा पायमल्ली होते हे नव्या घटनेमधून पुन्हा पुन्हा दिसून येते. जुने प्रसंग पुन्हा जीवंत होतात...
सप्टेंबर २०२४ - वर्सोवा
मुंबईच्या वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर अंधेरीचा राजा गणेश मूर्तीचे विसर्जन करत असताना एक बोट समुद्रात उलटून पडल्याने एक व्यक्ती गंभीरपणे जखमी झाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जवळच्या बोटींच्या तातडीच्या बचावकार्यामुळे अधिक लोक वाचले. एका व्हायरल व्हिडीओमध्ये अंधेरीचा राजा गणेश मूर्ती आणि किमान दोन डझन लोक असलेली बोट समुद्रात उलटताना दिसण्याची घटना व्हायरल झाली होती.
नोव्हेंबर २०२१ - गोवा
भारतीय नौदलाच्या पाणबुडीचा गोव्याच्या किनाऱ्याजवळ मच्छीमार नौकेसोबत अपघात झाला. यामध्ये त्या मच्छीमार नौकेवर असलेल्या १३ मच्छीमारांपैकी दोन मच्छीमार मृत्युमुखी पडले. नौदलाने मच्छीमार नौकेला दोष दिला आहे.
मे २०२२ बॅलार्ड पिअर
एलिफंटा आणि फेरी घाट/गेटवे दरम्यान प्रवाशांची वाहतूक करणारी 'मुसताकीन' नावाची एक प्रवासी बोट शनिवार सकाळी बॅलार्ड पिअरच्या किनाऱ्यावर बुडाली. या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. जवळच्या बोटीने सर्व प्रवाशांना वाचवले. मुंबई पोर्ट अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनुसार, ही घटना ११ वाजण्याच्या सुमारास घडली. १०० प्रवासी क्षमता असणारी बोट फेरी घाटाकडे जवळपास रिकाम्या अवस्थेत जात होती. सूत्रांनी सांगितले होते की, बोटीत तीन सदस्य होते. त्यातील दोन सदस्य जवळपासच्या बोटीने वाचवले, कारण त्यांनी दोरीच्या सहाय्याने बोटीतून उडी मारली. तर जहाजाच्या मास्टरने स्वतःला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली.
ऑगस्ट २०२३ - वर्सोवा
शनिवार सायंकाळी वर्सोवा किनाऱ्यापासून तीन किलोमीटर दूर समुद्रात मासेमारीची एक बोट उलटून मासेमारी करणारा विजय बामानिया (३५) याचा बुडून मृत्यू झाला. तर दुसरा विनोद गोयल (४५) हा पोहून सुरक्षितपणे किनाऱ्यावर पोहोचला. तिसरा मासेमारी करणारा, उस्मानी भंडारी (२२) हा बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवार सायंकाळी वर्सोवा गावातून चार मासेमारीच्या बोटी समुद्रात निघाल्या होत्या. प्रत्येक बोटीवर तीन जण होते. जोरदार वाऱ्याचा अंदाज घेत, चारपैकी तीन बोटी किनाऱ्यावर परत गेल्या.
फेब्रुवारी २०२४ - वसई
वसई ते भायंदर रोरो फेरीला शनिवार दिवशी प्रवाशांना घेऊन जात असताना अपघात झाला. शनिवार असल्यामुळे वसई जेटीवर गर्दी दिसून आली. २ वाजता बोटीचे इंजिन हे जेटीच्या सिमेंट काँक्रीट भिंतीत अडकले. स्थानिक मच्छीमारांची बोट आणि टोज बोट्स बोटीला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत.
फेब्रुवारी २०१७ एलिफंटा
१७ फेब्रुवारी २०१७ मध्ये ‘नवरंग’ नावाची प्रवासी फेरी बोट ७८ प्रवाशांना घेऊन एलिफंटा येथून परतीच्या प्रवासाला निघालेली असताना बोटीला अचानक अपघात झाला. बोट वळण घेत असताना अचानक एलिफंटाजवळील जेट्टीला जाऊन धडकली आणि बोटीचे इंजिनच बंद पडले. त्यामुळे समुद्राच्या लाटांवर फेरी बोट हेलकावे घेत धक्क्यापासून दूर गेली. यावेळी बोटीमध्ये असलेल्या ७८ प्रवाशांची भितीने गाळण उडाली. परंतु सुदैवाने या घटनेची माहिती तत्काळ भारतीय तटरक्षक दलाला देण्यात आली. थोड्याच अवधीत तटरक्षक दलाचे जवानांनी हॉवरक्राफ्टच्या मदतीने फेरी बोटीतील सर्व प्रवशांची सुखरूप सुटका केली. बोटीमधील बहुतेक प्रवासी हे पर्यटक होते आणि त्यातही काही विदेशी पर्यटक होते.
मार्च २०२० मांडवा
१५ मार्च २०२० या दिवशी ‘अजंता’ नावाची कॅटॅमरान बोट ९० प्रवाशांना घेऊन जात असताना रायगड जिल्ह्यातील मांडवा येथे समुद्रात बुडाली. गेटवे जलवाहतूक सहकारी संस्था यांच्या मालकीची असलेली ही बोट सकाळी गेटवे ऑफ इंडिया येथून मांडवा जेट्टीकडे निघाली होती. साधारण सव्वा दहाच्या सुमारास ही बोट समुद्रात एका खडकावर आदळली. बोट वेगात असल्यामुळे धडक बसलेल्या ठिकाणी बोटीचा काही भाग तुटला व त्यामुळे समुद्राचे पाणी बोटीत शिरायला सुरूवात झाली. मात्र, स्थानिक पोलिसांना वेळीच या घटनेची माहिती मिळाल्याने बोटीतील सर्व ८५ प्रवाशांना सुखरूप वाचविण्यात यश आले.
२४ मे २०२२ – तारकर्ली
मंगळवारी दुपारी १२.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावर बोटीच्या बुडण्यामुळे पुण्याचा एक डॉक्टर आणि अकोला येथील एक व्यक्ती बुडाले. या बोटीत २० जण होते. त्यात एक प्रौढ व्यक्ती गंभीर जखमी झाली. या घटनेतील पर्यटक पुणे, मुंबई, नवी मुंबई आणि कोल्हापूर येथून आले होते. बोटीतील लोक लाइफ जॅकेट घालून बसले नव्हते, असे स्थानिकांचे म्हणणे होते. मृत्युमुखी पडलेले डॉ. स्वप्निल पिसे हे पुणे येथील रहिवाशी आणि आकाश देशमुख हे अकोला जिल्ह्याचे रहिवासी होते.
जानेवारी २०१८ डहाणू
मुंबईजवळ भारतीय किनाऱ्यावर ४० शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एक नौका उलटली. या घटनेत ३२ विद्यार्थ्यांना वाचवण्यात आले तर तीन मृतदेह आढळले. यात दोन मुली असल्याची माहिती अहवालांमध्ये सांगण्यात आले. डहाणू येथील परिसरात बचाव कार्यासाठी जहाजे पाठवली गेली होती. नौका अधिक प्रवाशांनी भरले होती आणि विद्यार्थ्यांनी लाइफजॅकेट घातले नव्हते, असे सांगण्यात आले होते. मृतांपैकी दोन विद्यार्थ्यांची वयोमर्यादा १७ वर्षे असल्याचीही माहिती देण्यात आली होती.
डिसेंबर २०२४ भाऊचा धक्का
"जय माँ तारा" या मासेमारी बोटीसाठी काम करणारे मच्छीमार चेतनकुमार तांडेल हे त्यांची बोट मासेमारी करून भाऊचा धक्का, मुंबईला परतत असताना एका अज्ञात लाल रंगाच्या रासायनिक टँकरने त्यांच्या बोटीच्या डाव्या बाजूला धडक दिली. टँकर तीव्र वेगाने जात होता आणि त्यावर कोणतेही दिवे नव्हते. टँकरने मासेमारी बोटीला बाजूच्या छिद्राजवळ धडक दिली. त्यामुळे बोट उजव्या बाजूला वाकली आणि बुडाली. सुदैवाने, जवळच असलेल्या इतर मासेमारी बोटींच्या क्रू मेंबरने तांडेल आणि त्यांच्या टीमला बचावले. "जय माँ तारा" बोटीवरील मासेमारी क्रू 'कपिल फिशिंग ग्रुप'चा भाग होते. यलो गेट पोलिस स्थानकात अज्ञात जहाजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.