मुंबईत भाजप नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नीच्या आत्महत्येने मोठी खळबळ उडाली आहे. केईएम रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर गौरी पालवे-गर्जे यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर गौरीच्या कुटुंबीयांनी अनंत गर्जेवर गंभीर आणि धक्कादायक आरोप केले आहेत.
गौरी आणि अनंत यांचे अवघे दहा महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. परंतु घर शिफ्टिंग करताना पतीच्या प्रेयसीबाबतची आणि गर्भधारणेबाबतची धक्कादायक माहिती हातात आल्यानंतरच दोघांमधील वादाची सुरुवात झाली, असा गौरीच्या वडिलांचा दावा आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी अनंत गर्जेविरुद्ध आता गुन्हा नोंदवला आहे.
कुटुंबीयांची सीबीआय चौकशीची मागणी
गौरीच्या मृत्यूमागील सत्य बाहेर यावे म्हणून या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडे द्यावी, अशी मागणी पालवे कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
सापडले धक्कादायक कागदपत्र
गौरीचे वडील आणि मामांनी दिलेल्या माहितीनुसार, घर बदलताना गौरीला काही महत्वाची कागदपत्रे सापडली. त्यात किरण नावाच्या महिलेचे गर्भधारणेसंदर्भातील संमतीपत्र, गर्भावस्थेचा जाहीरनामा अशी कागदपत्रे होती. धक्कादायक म्हणजे, त्या संमतीपत्रावर पतीचे नाव म्हणून अनंत भगवान गर्जे असे स्पष्टपणे नमूद होते. ही कागदपत्रे पाहताच गौरीच्या मनात पतीच्या विवाहबाह्य संबंधांविषयीचा संशय दृढ झाला आणि त्यानंतर त्यांच्या नात्यातील तणाव वाढत गेला, असा कुटुंबीयांचा आरोप आहे.
अफेअर लपवण्यासाठी ब्लॅकमेलिंग
कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे की, अनंत गर्जे गौरीवर सातत्याने मानसिक छळ करीत होता.
तो म्हणायचा “हा विषय घरच्यांना सांगितलास तर मी स्वतःला संपवेन. चिठ्ठीत तुझं नाव लिहून ठेवेन.” एका वादात तर अनंतने स्वतःच्या हातावर वार करून घेतल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. वारंवार धमक्या देणे, अपराधी वाटण्यास भाग पाडणे, तसेच सततचा मानसिक त्रास यामुळे गौरीची स्थिती दिवसेंदिवस ढासळत गेली, असा तिच्या वडिलांचा दावा आहे.
ही आत्महत्या नसून हत्या
गौरीचे मामा हृषिकेश गर्जे यांनी तर ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा थेट आरोप केला आहे.
त्यांचे म्हणणे आहे, की ही आमच्या गौरीची हत्या आहे. गौरी लढाऊ स्वभावाची होती; ती आत्महत्या करणारी नव्हती. त्यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
पंकजा मुंडेंना दोष देणे चुकीचे
गौरीच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले की, पंकजा मुंडेंचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. पंकजाताईंना अनंत काय करत होता याची कल्पनाही नव्हती. ताईंवर आरोप करणे योग्य नाही. त्या अशा लोकांना सांभाळणाऱ्या नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी प्रारंभी गुन्हा नोंदवला नव्हता, त्यामुळे कुटुंबीय आक्रमक झाले. यानंतर रविवारी वरळी पोलिस ठाण्यात अनंत गर्जेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.