मुंबई : चुकून गोळी सुटून जखमी झालेला अभिनेता गोविंदा यांची बुधवारी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रुग्णालयात भेट घेऊन गोळीबार घटनेबाबत चौकशी केली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांनी पथकासह गोविंदा यांची भेट घेतली, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडून तपास सुरू असतानाच मुंबई क्राईम ब्रांचनेही समांतर तपास सुरू केला आहे.
गोविंदा यांच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटून त्यांच्याच पायाला लागली होती. मंगळवारी सकाळी ही घटना घडली त्यावेळी गोविंदा घरी एकटेच होते. सध्या त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
पोलीस निरीक्षक दया नायक यांनी आपल्या पथकासह गोविंदा यांची रुग्णालयात भेट घेऊन या घटनेची चौकशी केली. गोळीबारानंतर गोविंदा यांनी स्वत:च एका निवेदनाद्वारे या घटनेची माहिती दिली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्याकडून चुकून गोळी सुटली होती तरी पोलीस आणि आता क्राईम ब्रांच देखील याबाबत तपास करत असल्याचे समजते. विशेष म्हणजे याप्रकरणी कुणाकडूनही पोलिसांत तक्रार नोदवण्यात आलेली नाही. गोविंदा यांनी लोकसभा निवडणुकीच्या महिन्याभराआधीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय.