जगभरातील ८० देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळल्यानंतर भारतातील केरळ आणि आता दिल्लीत मंकीपॉक्सचा शिरकाव झाला आहे. मुंबईत मंकीपॉक्सचा तूर्तास धोका नसला तरी खबरदारी म्हणून ताप, सर्दी असल्यास तपासणी करून घ्यावी. तसेच कस्तुरबा रुग्णालयात बेड्स राखीव ठेवण्यात आल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी सांगितले. दरम्यान, लक्षणे आढळल्यास नॅशनल व्हायरोलॉजी ऑफ पुणे येथे नमुने पाठवण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोनाच्या संकटातून दिलासा मिळाला असतानाच आता मंकीपॉक्सचे संकट भारतात धडकले आहे. आधी केरळ आणि नंतर दिल्लीत मंकीपॉक्सचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देश आणि जग नुकतेच कोरोनाच्या संकटातून बाहेर येत असताना हिंदुस्थानसह ८० देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत आहेत. या अनेक देशांमधून हिंदुस्थानात दररोज येणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने पालिकेनेही सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. पालिकेचे विशेष रुग्णालय असलेल्या ‘कस्तुरबा’ रुग्णालयात सध्या सुमारे ८०० बेड तैनात आहेत; मात्र सद्य:स्थितीत रुग्ण किंवा लक्षणे असलेले संशयितही आढळत नसल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.