मुंबई

मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचे प्रमाण वाढले

स्वप्नील मिश्रा

कोरोनाची दुसरी लाट जोरात असताना मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचे प्रमाण पाच पटीने वाढल्याची धक्कादायक आकडेवारी जाहीर झाली आहे. जानेवारी ते जून २०२१ दरम्यान शंभरातील सरासरी चार जण हृदयविकाराच्या झटक्याने दगावल्याचे उघड झाले आहे. २०२० च्या तुलनेत हे प्रमाण मोठे होते.

मुंबईत २०१८ मध्ये हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ८६०१ होती. २०१९ मध्ये यात घट होऊन ५८४९ झाली. कोरोनाच्या पहिल्या लाटेत २०२० मध्ये यात आणखी घट होऊन ५६३३ मृत्यू नोंदले गेले. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात जानेवारी ते जून २०२१ या सहा महिन्यांच्या काळातच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्यांच्या संख्येत तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. या काळात १७८८० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे, असे आरटीआय कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी माहिती अधिकारांतर्गत मागविलेल्या माहितीमधून निदर्शनास आले आहे.

तज्ज्ञांनी सांगितले की, हृदयविकाराने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढणे, ही चिंताजनक बाब आहे. या मागे अनेक कारणे असू शकतात. या मृत्यूची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाल्या की, शहरातील हृदयविकाराने मरणाऱ्यांची संख्या निश्चीतपणे जास्त आहे. त्यातील बहुतेक हे ज्येष्ठ नागरिक होते. त्यांना सहव्याधीही होत्या. मात्र, या सर्व माहितीचे विश्लेषण होणे गरजेचे आहे.

कर्करोगबाधित मृतांच्या संख्येतही

वाढ होण्याची शक्यता

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये २०१९ च्या तुलनेत कर्करोगाच्या मृत्यूमध्ये सुमारे १३ टक्क्यांनी घट झाली होती. २०२० च्या वर्षभरात मुंबईत कर्करोगामुळे ८ हजार ५७६ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये हे प्रमाण वाढलेले असण्याची शक्यता असून जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या काळातच ६ हजार ८६१ मृतांची नोंद झाली आहे. पी. डी. हिंदुजा रुग्णालयाचे आपत्कालिन औषध विभागाचे डॉ. किशोर साठे म्हणाले की, २०२१ पासून ह्रदयविकाराच्या झटक्यामध्ये वाढ झाली आहे. ४० वयोगटातील तरुणांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. जीवनाविषयी अनिश्चीतता, नोकरीची अनिश्चीतता, वर्क फ्रॉम होम, ताण, कोविड लस घेतल्याने अनेकांनी ह्रदयविकाराचा झटका आल्याचे अनेकांनी सांगितले.

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

आज पनवेल, कल्याण, अंबरनाथ तापणार; ४४ अंश तापमानाचा अंदाज

५ लाख पर्यटकांचा प्रवास; ऐतिहासिक नेरळ-माथेरान टॉय ट्रेनला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मिळाला तब्बल 'इतक्या' कोटींचा महसूल

खासगीकरणाची 'बेस्ट' धाव ! बेस्टमध्ये आता ड्राफ्ट्समनही कंत्राटी; अंतर्गत कामासाठी कंत्राटी पद्धत