मुंबईसह मुंबई उपनगर आणि आजूबाजूच्या ठाणे, नवी मुंबई शहरात आज पहाटेपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसाचा फटका मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवेला बसला आहे. लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मुंबई सोबत सर्वच शहरात रविवारपासून पावसाने चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे लोकल चालवताना मोटरमनला अडचणी येत असून उपनगरीय रेल्वे सेवांचा वेग काहीसा मंदावला आहे. परिणामी लोकल वेळापत्रक विस्कळीत झाले होते. सोमवारनंतर आज पहाटेपासून तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. परिणामी मध्य रेल्वे सीएसएमटी ते कल्याण, हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर धावणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील लोकलही दहा मिनिटे विलंबाने होत आहेत. त्यामुळे लोकल गाड्यांना गर्दी झाली आहे. मध्य रेल्वेवरील कुर्ला, विद्याविहार, सायन यासह काही स्थानकांच्या बाहेर, तर रुळांच्या आजूबाजूलाही पाणी साचले आहे. पाऊस दिवसभर सुरु राहिल्यास लोकल वेळापत्रक आणखी विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.