IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं? (Photo-X)
मुंबई

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

साहिलच्या परीक्षा केंद्रातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज सध्या गुन्हे शाखेकडून तपासले जात आहे. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : आयआयटी बॉम्बेतील द्वितीय वर्षाचा बीटेक विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हे शाखेच्या तपासाला वेग आला आहे. १८ सप्टेंबर रोजी परीक्षा सुरू असताना दुपारी १२.३० ते १२.४५च्या सुमारास साहिल खिशातील काहीतरी पाहताना आणि एका प्राध्यापकाकडून त्याची विचारणा होताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर तो परीक्षा केंद्रातून बाहेर पडून दुपारी सुमारे १.२५ वाजता वसतिगृहातील खोलीत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे. या फुटेजच्या आधारे परीक्षा कक्षापासून वसतिगृहापर्यंतचा घटनाक्रम जोडण्याचा प्रयत्न गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

परीक्षा संपण्यापूर्वी नेमकं काय घडलं?

माध्यमांच्या वृत्तानुसार, १८ सप्टेंबर रोजी साहिल परीक्षा देत होता. परीक्षा संपण्यासाठी सुमारे १५ मिनिटे शिल्लक असताना, म्हणजेच दुपारी १२.३० ते १२.४५ दरम्यान, तो खाली वाकून आपल्या खिशातील काहीतरी पाहत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. त्यानंतर एका प्राध्यापकाने त्याच्याकडे याबाबत विचारणा केली. पुढे त्याला इतर विद्यार्थ्यांपासून बाजूला नेण्यात आल्याचेही फुटेजमध्ये दिसत असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेनंतर साहिल परीक्षा केंद्राबाहेर गेला. लॉबीतील सीसीटीव्ही फुटेजनुसार, दुपारी सुमारे १.२५ वाजता तो आपल्या वसतिगृहातील खोलीत पोहोचला. त्यानंतर तो पुन्हा खोलीबाहेर पडला नसल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.

कॅम्पस आणि वसतिगृहातील CCTV चीही पडताळणी

PTI च्या वृत्तानुसार, परीक्षा केंद्रातीलCCTV फुटेजसोबतच गुन्हे शाखेकडून IIT बॉम्बेच्या कॅम्पस परिसरातील आणि वसतिगृहातील CCTV फुटेजचीही पडताळणी केली जात आहे. मात्र, हे फुटेज सार्वजनिक करण्यात आलेले नाही किंवा प्रसारमाध्यमांना दाखवण्यात आलेले नाही. तपासाचा भाग म्हणून पोलिसांकडून त्याचे विश्लेषण केले जात आहे. साहिलच्या मृत्यूपूर्वीच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी संस्थेतील वेगवेगळ्या ठिकाणच्या कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहे. परीक्षा केंद्रातून बाहेर पडल्यानंतर साहिल कॅम्पसमधून वसतिगृहापर्यंत कसा गेला, याचा घटनाक्रम जोडण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.

CCTV फुटेज एकमेकांशी जोडून तपास

गुन्हे शाखेचे पथक संस्थेतील विविध ठिकाणांवरील CCTV फुटेज एकमेकांशी जोडून पाहत आहे. या माध्यमातून साहिलच्या अचूक हालचाली आणि मृत्यूपूर्वी घडलेल्या घटनांची क्रमवार पुनर्रचना करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे केवळ परीक्षा कक्षातील घटना नव्हे, तर परीक्षा कक्षापासून वसतिगृहापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम तपासाचा महत्त्वाचा भाग ठरला आहे.

मात्र, हे CCTV फुटेज सार्वजनिक करण्यात आलेले नाही किंवा प्रसारमाध्यमांना दाखवण्यात आलेले नाही. तपासाचा भाग म्हणून गुन्हे शाखेकडून त्याचे विश्लेषण केले जात आहे.

वसतिगृहातील खोलीची झडती

एसीपी धरमवीर बनसोड यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या पथकाने साहिलच्या वसतिगृहातील खोलीचीही झडती घेतली असून पंचनामा करण्यात आला आहे. खोलीतील संबंधित वस्तू आणि इतर बाबींची तपासणी करण्यात आली असून, साहिलच्या मृत्यूपूर्वीच्या घटनांचा तपशील जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पुरावे तपासले जात आहेत.

सुसाइड नोट सापडली नाही

साहिलच्या खोलीत आतापर्यंत कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. मात्र, यापूर्वी आयआयटीतील एका आत्महत्येच्या प्रकरणात सुरुवातीला चिठ्ठी सापडली नव्हती आणि नंतर ती एका पुस्तकातून मिळाली होती. त्यामुळे यावेळीही खोलीतील वस्तूंची बारकाईने तपासणी केली जात असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

चॅटजीपीटी वापरल्याचा आरोप

साहिल हा एनर्जी सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिकणारा विद्यार्थी होता. परीक्षेदरम्यान मोबाईलचा वापर करताना तो आढळला आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, या घटनेनंतर साहिलविरोधात कोणतीही औपचारिक शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नव्हती, असे आयआयटी बॉम्बेने यापूर्वी स्पष्ट केले आहे.

संस्थेच्या म्हणण्यानुसार, संबंधित शिक्षक आणि विभागप्रमुखांनी साहिलशी चर्चा केली होती. त्याचे समुपदेशनही करण्यात आले होते आणि या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम होणार नाही, असे त्याला सांगण्यात आले होते.

कुटुंबीयांचे गंभीर आरोप

दरम्यान, साहिलचे वडील रवींद्र वाकोडे यांनी संस्थेतील काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आयआयटी बॉम्बेच्या संचालकांच्या कथित सूचनेवरून प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांनी मागील तीन महिन्यांपासून साहिलला लक्ष्य केल्याचा आणि त्याच्याशी जातीआधारित भेदभाव केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या तक्रारीवरून पवई पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपासह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील संबंधित कलमांनुसार एफआयआर नोंदवला होता. त्यात प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांच्यासह इतरांची नावे नमूद करण्यात आली आहेत. या आरोपांची चौकशी सुरू आहे.

प्रा. दुल्ला निलंबित, संस्थेची निवेदनावर माफी

साहिलच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर आयआयटी बॉम्बेने प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांना विद्यार्थी व्यवहार अधिष्ठाता (डीन) पदावरून तत्काळ निलंबित केले आहे. मात्र, ते एनर्जी सायन्स अँड इंजिनीअरिंग विभागात प्राध्यापक तसेच विभागप्रमुख म्हणून कार्यरत राहतील.

दरम्यान, साहिलच्या मृत्यूबाबत संस्थेने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनातील वक्तव्यांबद्दल आयआयटी बॉम्बेने माफी मागितली आहे. तपास सुरू असताना साहिलच्या मृत्यूपूर्वीच्या घटनांबाबत तपशील अधिकृत तपासातून निश्चित होण्यापूर्वीच त्यांचे स्वरूप स्पष्ट करणे अयोग्य होते, असे संस्थेने मान्य केले आहे.

तिसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांचे आंदोलन

साहिलच्या मृत्यूनंतर आयआयटी बॉम्बेतील विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच आहे. ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत १८ मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत. प्रा. दुल्ला यांच्यावर प्राध्यापक म्हणूनही कारवाई करावी, स्वतंत्र चौकशी करावी आणि विद्यार्थ्यांसाठी २४ तास मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्यांचा त्यात समावेश आहे.

विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. मागण्यांवर २४ तासांत लेखी उत्तर देण्याचे आणि २६ सप्टेंबरपर्यंत अंमलबजावणीचा आराखडा देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

गुन्हे शाखेकडून तपासाला वेग

पवई पोलिसांकडून प्रकरण गुन्हे शाखेकडे हस्तांतरित झाल्यानंतर तपासाला वेग आला आहे. सुरुवातीला पवई पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या एफआयआरसह सर्व संबंधित कागदपत्रे गुन्हे शाखेकडून ताब्यात घेतली जात आहेत. सीसीटीव्ही फुटेज, परीक्षा कक्षातील घडामोडी, साहिलच्या वसतिगृहातील हालचाली आणि त्याच्या खोलीतील वस्तूंच्या आधारे घटनाक्रम स्पष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

साहिल परीक्षा कक्षातून बाहेर पडल्यानंतर सुमारे १.२५ वाजता वसतिगृहातील खोलीत पोहोचला आणि त्यानंतर बाहेर आला नसल्याचे सीसीटीव्हीच्या प्राथमिक तपासातून समोर येत आहे. मात्र, त्याच्या मृत्यूमागील नेमकी कारणे काय होती, हे तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : ८८ बेकऱ्यांना निर्वाणीचा इशारा; BMC ची कठोर कारवाई

Mumbai : सिग्नल यंत्रणेची देखभाल रखडली; नियंत्रकांच्या देखभालीसाठी पालिकेची ११ कोटींची फेरनिविदा

डीजेला कोणत्या आधारे परवानगी दिली जाते? कोर्टाने दाखल केली सुमोटो; आज सुनावणी

नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेला विरोध वाढला; कर्मचारी, अभियंत्यांचा आंदोलनाचा इशारा

Mumbai : मंडळांनी वीज जोडणी करताना खबरदारी घ्यावी; समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन